राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अलीकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही वर्षात अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतून अजित पवारांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे.
शिक्षणात जेमतेम असणारे अजित पवार आपली बुद्धी वाढावी म्हणून अनोखी क्लृप्ती वापरायचे. याबाबतची एक आठवण अजित पवारांनी स्वत: सांगितली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, “आमच्या घरात आमची मोठी बहीण रज्जो आक्का अतिशय हुशार होती. ती डॉक्टर झाली. सर्वात थोरले काका वसंतराव पवार यांची ती मुलगी आहे. माझी मोठी बहीण विजया पाटील तीही अतिशय हुशार होती.”
हेही वाचा- “…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान
“विजया लहानपणापासून मिरीटमध्ये असायची. त्यामुळे आम्ही कधी-कधी लहानपणी झोपल्यानंतर तिच्या (विजया पाटील) नकळत तिच्या डोक्याला डोकं लावायचो. मला धाकटी बहीण विचारायची दादा असं कशाला करतो? मी म्हणायचो तिची बुद्धी आपल्या डोक्यात येऊ दे, डोक्याला डोकं लागलं तर काहीतरी डोक्यात येईल. इथपर्यंतचा फालतूपणा आम्ही केला आहे, ” अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.
हेही वाचा- दहावीत नापास कसे झालात? अजित पवारांनी सांगितला शाळेतला ‘तो’ किस्सा
आपल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अजित पवारांनी पुढे सांगितलं, “मी ‘बी कॉम’ची पदवी पूर्ण केली नाही. माझं एक सत्र अपूर्ण राहिलं. निवडणुकीच्या अर्जात एस.वाय. बीकॉम असं लिहिता येत नाही. त्यामुळे मला बारावी पास असंच लिहावं लागतं. माझा निवडणुकीचा फॉर्म भरताना मी ‘बी कॉम’ असं कधीच लिहित नाही.”