सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पक्षाच्या अन्य बड्या नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतल्याची घडामोड अचानकपणे घडली. त्यामुळे इकडे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार समर्थकांनी जल्लोष केला. तर शरदनिष्ठांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे अजित पवार व त्यांच्या सहका-यांचा मंत्रिमंडळात झालेला सहभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चलित शिवसेनेत रुचला नसल्याचे संकेत मिळत आहे. यातच ज्यांनी यापूर्वी अजित पवार यांच्या काटशहाच्या राजकारणाला कंटाळून पर्याय म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला होता, ते ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गोटातही अस्वस्थता पसरल्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे अजितनिष्ठ अपक्ष आमदार संजय शिंदे आणि मोहोळचे आमदार यशवंत माने हे तिघेही अजित पवार यांच्या सोबत जाण्याचे संकेत मिळाले आहेत. आमदार बबनराव शिंदे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दुपारी निमगाव (ता. माढा) मुंबईकडे रवाना झाल्याचे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे वादग्रस्त प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदींचा मंत्रिमंडळात सहभाग झाल्याचे जाहीर समर्थन केले आहे. हा योग्य निर्णय असून त्यास शरद पवार हेसुध्दा समर्थन देतील, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा… राज्यातील विधानसभा व लोकसभेची एकत्र निवडणूक?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना पक्षाचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी पार्क चौकात मिठाई वाटून जल्लोष केला. राष्ट्रवादीतील या घडामोडीनंतर राष्ट्रवादीत अलिकडे दाखल झालेले माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक तौफिक शेख, प्रमोद गायकवाड आदींची ‘भूमिका वाट पाहा आणि पुढे चला ‘ अशी राहिली आहे. जिल्ह्यात सांगोला येथील पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे हे शिवसेना गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर एकत्र राजकारण करीत आहेत. आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दीपक साळुंखे यांची आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबरोबरची सलगी आणखी घट्ट होण्यास मदत झाल्याचे बोलले जाते.
हेही वाचा… “बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधलाय, येत्या दोन दिवसांत…”, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान
जिल्ह्यातील एकमेव शिंदे गटाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मधूर संबंध राहिले आहेत. तथापि, इकडे आषाढी वारीच्या निमित्याने सोलापूर व पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागोपाट दोनवेळा दौरे केल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये चैतन्य पसरले होते. परंतु त्यांच्यात सावधानतेचे वातावरण पाहायला मिळाले आहे. अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होणे शिंदे गटाला रूचले नसल्याचे संकेत मिळाले असून मुख्यमंत्री शिंदे यांचे भवितव्य काय असेल, याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.