राज्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांमधील घटकपक्षांकडून प्रचारसभांमधून टीका-टिप्पणी केली जात आहे. बारामतीमध्ये तर लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांमध्येही कुटुंबातलाच सामना पाहायला मिळत आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत बारामती विधानसभा मतदारसंघात आहे. अजित पवारांनी आज बारामतीमध्ये घेतलेल्या सांगता सभेमध्ये राजकीय टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी ९० सालची एक आठवणदेखील सांगितली.

“शरद पवारांनी संधी दिली तेव्हा भीती वाटत होती”

आपल्या भाषणात अजित पवारांनी ९० सालची एक आठवण सांगितली. शरद पवारांनी तेव्हा पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातली उमेदवारी अजित पवारांकडे सोपवली होती. त्यावेळी आपल्याला भीती वाटत होती, असं अजित पवार म्हणाले. “शरद पवारांनी मला १९९०मध्ये बारामतीचं प्रतिनिधित्व दिल्यानंतर मला भीती वाटत होती. कारण शरद पवारांसारखा नेता बारामतीकरांचं १९६७, १९७२, १९७८, १९८०, १९८५, १९९० असं प्रतिनिधित्व करत होते. नंतर आपण तिथे जायचं आणि त्यात जर आपण कमी पडलो तर बारामतीकर बिनपाण्यानंच माझी करतील. बाकी काही ठेवणार नाही असं मला वाटायचं”, असं अजित पवार म्हणाले.

“लोक म्हणतील साहेब एवढं काम करायचे आणि हा तर नुसताच झोपतोय. तेव्हापासूनच माझी झोप गेली. तेव्हापासूनच पहाटे लवकर उठायची सवय लागली आणि रात्री उशीरापर्यंत काम करायची सवय लागली. तेव्हापासून आजपर्यंत विकासाच्या बाबतीत मागे वळून बघितलं नाही”, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी यावेळी केली.

अजित पवारांना सांगितल्या दोन चुका!

दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी त्यांना एका व्यक्तीने त्यांच्या दोन चुका सांगितल्याचा उल्लेख केला. “मला एकानं सांगितलं. मी विचारलं का रे बाबा आपण एवढं सगळं काम करतो तरी लोक वेगळाच निर्णय का घेतात? तर ते म्हणाले दादा तुमचं काय आहे, कुणी आलं आणि तुमच्याकडे पीए वगैरे असले की तुम्ही लगेच सांगता लाव फोन. लगेच फोन लावता आणि त्याचं काम मार्गी लावण्याचं काम करता. बऱ्याचदा तिथल्या तिथे काम झाल्यामुळे आलेल्या माणसाला त्या कामाची किंमतच राहात नाही. जर दोन-चार हेलपाटे मारायला लावले, तर त्याला त्या कामाची किंमत कळते असं मला आपल्याच भागातल्या एका वस्तादानं सांगितलं”, असं अजित पवार म्हणाले.

“पुढे तो म्हणाला तुमचं दुसरं एक चुकतं. तुम्ही बोलताना तहान लागल्यावर पाणी मागता. इथे तहान लागायच्या आधीच पाणी देताय. त्यामुळे त्याला काही किंमतच राहात नाही. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होतायत, न सांगता पाण्याचा कॅनोल सुटतोय त्यामुळे गणित चुकतंय. ठीक आहे, ते त्याचं मत होतं”, असंही अजित पवार पुढे म्हणाले.