संपूर्ण जगभरात आज जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत हा दिवस साजरा केला. संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाबाहेरच्या भव्य पटांगणात मोदींनी हजारो परदेशी नागरिकांसह योगाभ्यास केला. दिल्लीत केंद्र सरकारने देखील मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यासह वेगवेगळी राज्ये आणि शहरांमध्ये शासकीय कार्यालयांनी तसेच खासगी संस्थांनी मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्र सरकारनेही विधान भवनाबाहेर विशेष योग शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापासून ते अनेक मंत्री, भाजपा-शिंदे गटातले आमदार आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. परंतु ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु हे तिन्ही नेते कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यापैकी अजित पवार आणि नरहरी झिरवळ हे काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी अजित पवारांनी नरहरी झिरवळांना शाब्दिक चिमटा काढला.

अजित पवार म्हणाले, जागतिक योग दिनानिमित्त विधान भवनासमोर आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आम्हालाही या कार्यक्रमाला बोलावलं होतं. मला, अंबादास दानवेंना बोलावलं होतं. नरहरी झिरवळ साहेबांनाही बोलावलं होतं, परंतु झिरवळ साहेब इथेच आहेत. म्हणून मी त्यांना विचारलं, झिरवळ साहेब तिकडे का गेला नाहीत? मी त्यांना म्हटलं, मी तर गेलो नाही, कारण तिथे जाण्यात काय अर्थ आहे. तिथे यांचाच सगळा उदो उदो चाललेला असेल. पण झिरवळ साहेब तुम्ही का गेला नाहीत?

हे ही वाचा >> “…म्हणून मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा”, शरद पवारांसमोर अजित पवारांनी मांडली व्यथा; म्हणाले…

अजित पवारांनी सांगितलं, माझ्या प्रश्नावर झिरवळ साहेब म्हणाले, दादा पोट एवढं वाढलंय की योगा होतच नाय माझ्याकडून. पोट इतकं वाढलेलं असताना, सगळ्यांच्या देखत मला योगा नाय आला तर सगळे माझ्याकडेच बघतील. यावर पट्या खरं बोलला, तो म्हणाला, योगा होत नाही, पण बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो. अजित पवारांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला. यावर अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले, तुमच्यातला कोण तुमच्या बायकोला घेऊन नाचू शकतो का? एक वेळ तुमची बायको तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल पण तुम्ही नाही नाचू शकत.