महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मागील जवळपास दीड वर्षांपासून राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सातत्याने नवनवीन तारखा दिल्यानंतर अलीकडेच अचानक अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार गट सत्तेत सामील होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मागून आलेल्या आमदारांचा आधी शपथविधी घेतल्याने शिंदे गटासह भाजपातील अनेक आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्ताराचा गुंता आणखी वाढत चालला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर उद्या (गुरुवार, १३ जुलै) उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी कार्यक्रम होईल, असं बोललं जात आहे.
हेही वाचा- रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जुंपली; रुपाली चाकणकरांचा भरत गोगावलेंवर हल्लाबोल
तत्पूर्वी, सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदाराची बैठक पार पडणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळणार? याबाबतच चित्र स्पष्ट होणार आहे. खरं तर, शिंदे गटासह भाजपाचे अनेक आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.