Baba Adhav protesting for Constitution in Pune Ajit Pawar Visits : ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं आढाव यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार ते तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. आज (३० नोव्हेंबर) त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्हाला त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करता येत नाही”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, “मला बाबा आढाव यांना सांगायचं आहे की काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी संबंधित असतात. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहेत. त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही. त्यांना जे योग्य वाटतं, ते निर्णय त्यांनी दिले आहेत. मी स्वतः बारामतीचा उमेदवार होतो. मी पाहिलं आहे की संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतदारांची गर्दी वाढली होती. मी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार येतील त्या सर्वांसाठी बाहेर वीजेची व्यवस्था करा आणि सगळ्यांना मतदान करता येईल याची काळजी घ्या”.

हे ही वाचा >> “शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

माजी उपमुख्यमंत्री म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून आल्या होत्या. आमच्या केवळ १७ जागा आल्या. आम्ही तो पराभव मान्य केला. कारण तो जनतेचा कौल होता. परंतु, तेव्हा कोणीच ईव्हीएम वरून प्रश्न उपस्थित केले नाहीत. माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघात माझा उमेदवार ४८ हजार मतांनी पराभूत झाला. मात्र मी त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलो आहे. कारण बारामतीच्या जनतेचं पहिल्यापासून ठरलेलं आहे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. त्यानुसारच ते मतदान करतात. लोकसभा निवडणुकीत ज्या गावांमधून आम्हाला मतदान मिळालं नाही, तिथं मला विधानसभेच्या वेळी भरभरून मतदान मिळालं आहे. आता पाच महिन्यांत जनतेचा कौल बदलला याला आम्ही काय करणार.”.

हे ही वाचा >> “एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावी गेलेत”, संजय राऊतांचा बोचरा वार; नेमकं काय म्हणाले?

१९९९ च्या निवडणुकीवेळी बारामतीमधील मतदारांनी शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत ८५ हजार मतांनी जिंकवलं होतं. मला त्यावेळी केवळ ५० हजार मतांची आघाडी मिळाली होती. परंतु, तेव्हा मी त्यावेळी निवडणूक प्रणालीवर संशय व्यक्त केला नव्हता, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar meets baba adhav protesting for constitution indian deemocracy evm asc