उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीसह वेगवेगळ्या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. आज २० मार्च रोजी अजित पवार यांनी खेड तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीदरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, भोसरी या भागांचा दौरा अजित पवारांनी केला. यावेळी त्यांनी खेडचे आमदार आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत एक मिश्किल टोला लगावत मोहीते पाटील यांना कोपरखळी मारली.
अजित पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अशी मागणी केली. कार्यकर्त्यांच्या या मागणीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विधान केले. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आले. “ज्या वेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री होईल”, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : आता आम्हीच खरी माहिती जनतेसमोर आणतो”, शरद पवार गटाची सविस्तर पोस्ट; सर्वोच्च न्यायाल…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गट लढवण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासदंर्भाने उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चर्चा झाली. मात्र, या चर्चेत नेमके काय ठरले? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असणार? हे स्पष्ट झालेले नाही.
शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी अधिक लक्ष घातले असल्याचे चित्र सध्या दिसते. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत आव्हान दिले होते. “एका खासदाराने मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिले असते, तर खूप चांगले झाले असते. मात्र, आता शिरूरमधून उमेदवार निवडून आणणारच”, असे अजित पवार म्हणाले होते. यानंतर आता अजित पवार हे स्वत: स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.