उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “भाजपाचं हिंदुत्व हे बेगडी आहे. शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या चळवळीतील आम्ही कार्यकर्ते आहोत. तत्वांशी तडजोड करणार नाही,” असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपाचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व. बाकिच्यांचं हिंदुत्व नाही का? मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा टोकाचा विरोधात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही स्वयंसेवक संघाच्या विरोधात होते. शामा प्रसाद मुखर्जी यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर होते. पण, संघाच्या विरोधात त्यांनी युद्ध थांबवलं नाही.”
हेही वाचा : “भाजपाने राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मग..”, सुप्रिया सुळेंचं विधान
“आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात सांगणारी लोक आहोत. भाजपाचं हिंदुत्व हे बेगडी आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या चळवळीतील आम्ही कार्यकर्ते आहोत. तत्वांशी तडजोड करत नाहीत,” असं स्पष्टीकरण मिटकरींनी दिलं आहे.
“अजित पवार यांच्याबरोबर सर्व पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार नेते आहेत. आमचा पक्ष फुटीर नाही. शरद पवार आमचे आदर्श आहेत,” असं अमोल मिटकरींनी सांगितलं.
हेही वाचा : “वसंतदादा तुम्ही आज असायला पाहिजे होता, देवेंद्रजींनी…”, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका
पक्षाच्या कार्यालयातील नेत्यांच्या फोटोला काळ फासलं, याबद्दल विचारल्या मिटकरींनी म्हटलं की, “काही कार्यकर्ते फार उतावीळ असतात. मात्र, फोटोला लागलेलं काळ पुसण्याचं काम जितेंद्र आव्हाडांनी केलं. पक्षातील कोणत्याही नेत्यांचा अपमान करण्याचं काम उतावीळ कार्यकर्त्यांनी करू नये. भावनेच्या भरात कार्यकर्ते चूक करतात. पण, नंतर लक्षात येते आपण चूक केली आहे.”