राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जुंपल्याचंच पाहायला मिळालं आहे. सत्तादाऱ्यांना घेरण्याची एकही संधी विरोधकांकडून सोडली जात नसल्यामुळे अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. मात्र, तापलेल्या राजकीय वातावरणातही विधानभवनात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मिश्किल टिप्पणी आणि हलक्या-फुलक्या वातावरणात मारलेले टोलेही पाहायला मिळतात. आज ऑनलाईन औषध खरेदीसंदर्भात विधानसभेत चर्चा सुरू असतानाही अशाच प्रकारचा एक संवाद ऐकायला मिळाला. यावरून सभागृहात चांगलाच हशादेखील पिकला होता.
नेमकं घडलं काय?
विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी ऑनलाईन औषध खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला. “ऑनलाईन पद्धतीने सध्या औषधं खरेदी केली जात आहेत. मात्र, त्यातून अनेक रुग्णांना समस्या उद्भवत असल्याचं समोर आलं आहे”, असं नाना पटोले म्हणाले. यावेळी नाना पटोलंनी चुकून गिरीश महाजनांचा उल्लेख ‘डॉक्टर’ असा केला. इतर सदस्यांनी चूक लक्षात आणून देताच “त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणच दिलं जातं नेहमी, त्यामुळे झालं”, असं पटोले म्हणाले. त्यांच्या या उत्तरावर सभागृहात हशा पिकला.
“ही ऑनलाईन औषध खरेदीवर काय व्यवस्था निर्माण केली जाणार आहे? ही खरेदी कशी थांबवता येईल यावर सरकार काय पावलं उचलणार आहे?” असा प्रश्न नाना पटोलेंनी यावेळी उपस्थित केला.
गिरीश महाजनांनी माईक ठोकला आणि…
नाना पटोलेंच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी गिरीश महाजन उभे राहिले असता त्यांचा माईक बंद असल्याचं लक्षात आलं. त्यावर “मंत्र्यांचा तरी माईक चालू ठेवा”, अशी शेरेबाजी सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरून करण्यात आली. माईक चालू नसल्याचं पाहून गिरीश महाजनांनीच थेट माईक ठोकायला सुरुवात केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी “तोडू नका. तोडू नका”, अशी टिप्पणी करताच पुन्हा सभागृहात हशा पिकला.
अध्यक्षांच्या टिप्पणीवर गिरीश महाजनांनीही हसणाऱ्या अजित पवारांकडे पाहून “अहो दादा तो थोडा असा आहे” म्हटलं आणि पुन्हा एकदा माईकवर हात मारून तो चालू आहे याची खात्री करून घेतली.
अजित पवारांची मिश्किल टिप्पणी आणि सभागृहात हशा
दरम्यान, यावर अजित पवारांनीही त्यांच्या हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावानुसार गिरीश महाजनांना कोपरखळी मारली. “काय आहे, त्यांच्या हातात काहीही आलं, तरी ते असे ठोकतात”, असं अजित पवार म्हणाले आणि सर्व आमदारांनी अजित पवारांच्या विनोदाला दिलखुलास दाद दिली.
दरम्यान, “प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय आपल्याकडे कोणतंही औषध द्यायचं नाही असा आपल्याकडे कायदा आहे. ऑनलाईनही तुम्हाला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन द्यावं लागतं. या मुद्द्याची दखल घेऊ”, असं उत्तर गिरीश महाजनांनी नाना पटोलेंच्या प्रश्नावर दिलं.