राज्याचं कोणतंही अधिवेशन असलं, तरी त्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं. यंदाचं अधिवेशनही त्याला अपवाद नाही. भाजपानं सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांवर निशाणा साधला आहे. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, अशा वातावरणात देखील सभागृहात घडणारे काही किस्से किंवा सदस्यांची मिश्किल भाषणं राजकीय डावपेच आखणाऱ्या नेतेमंडळींमध्ये देखील हास्याची लकेर उमटवून जातात. बुधवारी विधानपरिषदेतील १० सदस्यांचा कार्यकाळ संपत असताना अजित पवारांनी निरोपासाठी केलेल्या भाषणात तुफान टोलेबाजी केली. यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पक्षश्रेष्ठींशी जवळीक साधणं कठीण असतं”

भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा कार्यकाळ संपत असताना अजित पवारांनी त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. “प्रसाद लाड आमच्याकडे होते तेव्हा आमच्या एकदम जवळचे होते, तिकडे गेले तसे देवेंद्र फडणवीसांच्या एकदम जवळ झाले. सगळ्यांनाच अशी जवळीक जमते अशातला भाग नाही. कुठल्याही पक्षात गेलो, की तिथल्या पक्षश्रेष्ठींशी जवळीक साध्य करणं कठीण असतं. त्यात आमचे प्रसाद लाड एकदम निष्णात आहेत. काम करत असताना आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनात तेवढी विश्वासार्हता निर्माण करणं हे मोठं कौशल्य असतं”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

कुणाला प्रसाद आणि कुणाचे लाड!

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी प्रसाद लाड यांच्या नावावरूनही कोटी केली. “मला आठवतंय की आमच्या पक्षातूनही त्यांना सभागृहात (विधानपरिषद) आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण तेव्हा थोडी गडबड झाली आणि काही मतं फुटली. त्यामुळे तेव्हा ती संधी हुकली. त्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. ते भाजपासोबत गेले”, असं अजित पवार म्हणाले.

भाजपचे संख्याबळ घटणार ; राजकीय टोलेबाजीत विधान परिषदेत सदस्यांना निरोप

“ते सासरेबुवा झालेत, त्यांच्यावर घसरत नाही”

“खरंतर त्यांच्या नावातच प्रसाद देखील आहे आणि लाड देखील आहेत. आता कुणी कुणाचे लाड केले आणि कुणी कुणाला प्रसाद दिला, हे काही सांगता येत नाही. आता ते सासरेबुवा झालेत, त्यामुळे त्यांच्यावर मी फार घसरत नाही. त्यांचे महाराष्ट्रातील भाजपाच्या नेतृत्वाशी असणारे संबंध बघता, त्यांना नक्कीच पुन्हा संधी मिळू शकणार आहे. भाजपाचे ४ सदस्य १०० टक्के येणार आहेत”, असा टोला देखील अजित पवारांनी यावेळी लगावला.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रवींद्र फाटक, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौंड या दहा सदस्यांचा कालावधी जुलै महिन्यात संपत आहे. त्यांना विधान परिषदेत बुधवारी निरोप देण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व सदस्यांची कामगिरी, अनुभव आदींबाबत विवेचन केले.