राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार होते. तसेच, ते तेव्हाही राज्याचे उपमुख्यमंत्रीच होते. आता भाजपा व शिंदे गटाच्या आघाडीत अजित पवार गट सामील झाल्यानंतरही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. असं असलं, तरी पुण्याचे ‘सुपर पालकमंत्री’ अजित पवारच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं बोललं जात असताना पुण्यात दोघांमध्ये मिश्किल चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते पालकमंत्री असतानाच्या शिरस्त्याप्रमाणेच आत्ताही पुण्यात प्रशासन व विविध संस्था-संघटनांच्या बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळ, प्रशासन व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. यावेळी काही मुद्दे उपस्थित झाल्यावर चंद्रकांत पाटील संबंधिक अधिकाऱ्यांना सूचना देत होते.

पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण?

अजित पवारांनी करून दिली मराठीची आठवण!

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटलांच्या एका कृतीनंतर अजित पवारांनी त्यांना पुण्यात मराठी भाषेत बोलण्यासंदर्भात आठवण करून दिली. अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सूचना देताना चंद्रकांत पाटील हिंदीतूनच “अभी आप बोलो”, “अभी आप बात किजीए” अशा सूचना द्यायला सुरुवात केली. यावेळी अचानकच अजित पवार मध्ये मिश्किलपणे “मधनंच आज हिंदी का बोलायला लागला आहात तुम्ही पुण्यात?” असा प्रश्न हसत विचारला. या प्रश्नावर चंद्रकांत पाटील हसू लागले.

“मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांना थेट आव्हान?

या उत्तराबरोबर पुढच्याच क्षणी पाटील यांनी अजित पवारांच्या जवळ जात त्यांना दबक्या आवाजात काहीतरी सांगितलं. त्यावर अजित पवार दिलखुलासपणे हसल्याचं पाहायला मिळालं. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या कानात नेमकं असं काय सांगितलं ज्यामुळे ते एवढ्या मोठ्याने हसायला लागले? याची माहिती मिळू शकली नाही.

बैठकांवरून चंद्रकांत पाटलांना टोला!

दरम्यान, नंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांप्रमाणे चंद्रकांत पाटील आठवड्याला बैठक न घेता महिन्याला बैठक घेतात असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी त्यावर पुन्हा मिश्किल टिप्पणी केली. “मला वाटतं मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम सातच दिवस राहणार आहे. म्हणून मी पुढच्या आठवड्यात लगेच बैठक घेत असतो. पण काही लोकांना असं वाटतं की त्यांनी घेतलेल्या बैठकांचा परिणाम एक ते दोन महिने राहणार आहे. त्यामुळे ते एक ते दोन महिन्यांनंतर बैठका घेतात”, असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks chandrakant patil bjp on hindi language in pune meeting pmw
Show comments