Samruddhi Mahamarg: पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी सकाळीच नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जपळपास ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच यावरून स्थानिक जमीन अधिग्रहण ते कंत्राटापर्यंत अनेक बाबींवर वाद झाले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. अखेर आज समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये ‘श्रेयवाद’?

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे बॅनर नागपूरमध्ये झळकत आहेत. त्यामुळे समृद्धीचं श्रेय घेण्यावरून दोघांमध्ये चढाओढ असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना अजित पवारांनी ही शक्यता फेटाळली आहे. पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

“समृद्धीचं श्रेय घेण्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा असेल असं मला काही वाटत नाही. कारण दोघांनी एकत्रच पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. दोघांनी एकत्रच रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी ड्रायव्हिंगचं काम देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं होतं. त्यात गाडीचा वेगही १५० पर्यंत होता. गाडी कुणाची वगैरे हा वेगळा विषय आहे”, असं म्हणत अजित पवारांनी या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली.

“आपण युद्धात जिंकतो, तहात हरतो” म्हणत अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला; म्हणाले, “मला गनिमी काव्याबद्दल विचारलं तर…!”

अजित पवारांना पडणारा प्रश्न…

दरम्यान, अजित पवारांनी यावेळी समृद्धी महामार्गावरील वेगासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. “मलाही कधीकधी प्रश्न पडतो की मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग १००, दुसऱ्या कुठल्या रस्त्यावर गाडीचा वेग ८० आणि समृद्धी महामार्गावर गाडीचा वेग १५०. एवढी तफावत आहे तिथे. कुठल्या निकषांवर ही वेगवेगळी वेगमर्यादा घालण्यात आली. पण कधीतरी चर्चा निघेल, तेव्हा मी नक्की विचारेन की यामागचं नेमकं गमक काय आहे? लोकांनी नक्की काय समजावं? उद्या कुणी यावर न्यायालयात गेलं, तरी तिथे उत्तर द्यावं लागेल”, असं अजित पवार म्हणाले.

“प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेचा विचार झालाच पाहिजे. त्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील, ते सरकारने घ्यावेत. त्याला आमचा पाठिंबा आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks cm eknath shinde devendra fadnavis samruddhi mahamarg speed limit pmw