राज्यात सत्ताबदलानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चालू असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील तिनही पक्षांवर सत्तेत असणाऱ्या शिंदे गटासह भाजपानंही हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ठाकरे गटाकडूनही ‘खोके सरकार’ किंवा ‘गद्दार सरकार’ म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमवीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर कामाख्या मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचं समोर आल्यानंतर त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, यावेळी दीपक केसरकरांनी याबाबत केलेल्या वक्तव्यावरही अजित पवारांनी टोला लगावला आहे.
“दीपक केसरकरांचा अभ्यास वाढलाय”
पुण्यामध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी सरकारवर टीका केली. यावेळी दीपक केसरकरांनी गुवाहाटी दौऱ्याविषयी केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “ठाकरे सरकार पाडण्यासाठी कामाख्या देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला चाललोय”, असं दीपक केसरकर म्हणाल्याचं पत्रकारांनी सांगताच अजित पवारांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “शालेय शिक्षणासारखं महत्त्वाचं खातं सध्या त्यांच्याकडे आहेत. अलिकडच्या काळात त्यांचा एवढा अभ्यास वाढला आहे. त्यामुळे ते अभ्यासपूर्णच बोलले असतील. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचं स्वागतच आहे”, असं अजित पवार म्हणाले.
कराडमधील निमंत्रण वादावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ठीक आहे, शेवटी…!”
“कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात”
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. “ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसं तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो”, असं अजित पवार म्हणाले.