राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावासाठी परिचित आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर किंवा आपल्या विरोधकांवर टीका करताना अजित पवार त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करताना दिसतात. आज विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा समाचार घेतानाही अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी केली. “लबाडाघरचं आवतण जेवल्याशिवाय खरं नसतं”, असं म्हणत त्यांनी सरकारवरही टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर बाहेर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी दूरदृष्टी नसलेला अर्थसंकल्प आणि चुनावी जुमला असं म्हणत अर्थसंकल्पावर ताशेरे ओढले. मात्र, असं करताना अजित पवारांनी राज्य सरकारवर मिश्किल टिप्पणी केली. अर्थसंकल्प वाचला जात असताना आपल्याला १४ मार्च तारीख दिसत होती, असं अजित पवार म्हणाले आहेत.

“त्यांना बहुतेक रात्री कळलंय की…!”

“मला तर अर्थसंकल्प वाचत असताना १४ मार्च तारीख डोळ्यांसमोर येत होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी आहे? १४ मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे. म्हटलं यांना बहुतेक रात्री कळलंय की १४ मार्चला निकाल विरोधात जाणार. त्यामुळे जेवढ्या आपल्या बाजूने घोषणा करता येतील तेवढ्या करून घ्या असं असेल”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी? वाचा सविस्तर!

“कसबा, शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना झटका बसलाय. ९ महिन्यांपूर्वीच आपण सरकारमध्ये आलोय, पण जनता आपल्यासोबत नाही हे खेडच्या सभेत त्यांनी पाहिलं. खेडची सभा न भूतो न भविष्यती अशी होती. माणसं आणलेली नव्हती. माणसांना विचारलं तर सांगत होती की उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला आम्ही आलो आहोत. दसऱ्याला शिंदेंच्या मेळाव्यात लोक सांगायचे कशाला आलोय आम्हाला माहिती नाही. आम्ही आलो होतो, आता चाललोय परत. वरळीच्या सभेत तर सगळ्या खुर्च्याच खाली होत्या. या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यानंतर आता होतं नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढे बघू या हेतूने मांडलेला हा दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प आहे”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी फडणवीसांना करून दिली ७ वर्षांपूर्वीच्या घोषणेची आठवण; म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीसाठी…!”

एक एप्रिलला झटका?

दरम्यान, एक एप्रिलला नागरिकांना झटका बसणार असल्याचं अजित पवार म्हणाले. “मला माहिती मिळालीये की २५ तारखेला अधिवेशन संपलं की १ एप्रिलला झटका लागणार आहे. ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ आहे. फक्त ते आत्ता सांगत नाहीयेत. अर्थसंकल्प संपल्यानंतर सांगणार आहेत”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks devendra fadnavis maharashtra budget 2023 pmw