गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार व त्यांच्या नावाने शरद पवारांवर केलेल्या टीकेची चर्चा चालू आहे. राजकीय टीकेची पातळी घसरल्याची भूमिका सातत्याने राजकीय विश्लेषकांकडून मांडली जात आहे. तसेच, राजकीय पक्षांच्या वरीष्ठ नेतेमंडळींकडूनही यासंदर्भात इतर नेत्यांना टीका करताना बोलण्याचं भान ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, तरीही या प्रकारची टीका होत असून त्यासंदर्भात आता सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे प्रमुख अजित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. गेल्या आठवड्यात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य करतानाच शरद पवारांवरही टीका केली. “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“गोपीचंद पडळकरांना काळं फासा अन् एक लाख मिळवा”, अजित पवार गटातील नेत्याची घोषणा

अजित पवार सरकारमध्ये असूनही गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेची सध्या चर्चा होत असताना अजित पवारांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. “कुठेही जाती-धर्मांत तेढ निर्माण होऊ नये. वाचाळवीरांनी वाचाळ भाषा बंद करावी. मलाही खूप बोलता येतं. पण आपली काहीतरी पद्धत आहे, परंपरा आहे. त्याचं जतन केलं पाहिजे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“अशा टीकेनं माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत”

दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेसंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अजित पवारांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. “मी कुणाशी काहीही बोलत नाही. कुणी टीका केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही. असल्या टीकेला मी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतो आणि सोडून देतो. पण मीच चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य ऐकली आहेत. मला या गोष्टीला फार महत्त्व द्यायचं नाहीये. मी कामाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.