गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जगभरात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाचा सामना करण्यासाठी आता प्रभावी लसी देखील उपलब्ध झाल्या असून जगभरात वेगाने लसीकरण केलं जात आहे. मात्र, करोनाच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टरांकडून बाधितांना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुचवले जात असत. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना एक गंमतीशीर आठवण सांगितली आहे. पुण्यात जैव सुरक्षा स्तर 2 आणि 3 नविन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अजित पवारांनी सांगितली करोनाची आठवण!
यावेळी शाकाहार विरुद्ध मांसाहार यासंदर्भातला विषय निघाल्यानंतर अजित पवारांनी त्यांना करोना झाल्यानंतरची आठवण सांगितली आहे. “आम्हाला जेव्हा गेल्या वर्षी करोना झाला आणि उपचारांनंतर आम्ही बाहेर पडलो, तेव्हा डॉक्टर सांगायचे जरा पौष्टिक आहार घेतला पाहिजे. मग काय घ्यायचं, तर पाया सूप घ्या. असलं काहीतरी सांगायचे. जे काही सांगायचे ते नॉन व्हेजचंच सांगायचे. चिकन सूप घ्या, पाया सूप घ्या, मटण सूप घ्या”, असं अजित पवार म्हणाले.
“शाकाहारी वि. मांसाहारी हा कित्येक वर्षांचा वाद”
“जे शाकाहारी आहेत त्यांची पंचाईतच आहे. मग त्यांच्यासाठी तेवढ्याच तोडीचं काहीतरी द्यायचा प्रयत्न केला गेला. मशरूम हे त्यातलं एक समजलं जातं. पण ठीक आहे. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी हे पिढ्यान पिढ्या चालत आलं आहे. त्याच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. त्यात खोलात जाऊन मी आपला वेळ घेत नाही. पण वर्षानुवर्ष काही समाजघटकांच्या आहारात मांसाहार चालत आला आहे”, असं अजित पवार म्हणाले.