राज्यात वॉक-इन स्टोअर्स आणि सुपरमार्केटमध्ये देखील वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तर उपोषणाला देखील बसण्याचा इशारा दिला. या निर्णयावरून विरोधकांनी सुरू केलेल्या आरोपांचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात देखील उमटले. हा मुद्दा विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या शैलीत केलेली टोलेबाजी उपस्थितांची दाद मिळवून गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर कमी केल्यामुळे उत्पन्न वाढलं!

मद्यावरील कर ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून टीका केली गेली. यावर कर कमी केल्यामुळे उलट उत्पन्न वाढल्याचं अजित पवार म्हणाले. “काही ठिकाणी दारूवर ३०० टक्के कर होता. तो आम्ही १५० टक्क्यांवर आणला. कारण जे लोक दिल्लीला जायचे, ज्यांना दारूची सवय आहे असे लोक येताना दोन्ही हातात ४-४ बाटल्या घेऊन यायचे. कारण तिथे शुल्क कमी होतं. त्यामुळे कर कमी केला. घेणारा घेतच असतो. कर कमी केल्यापासून सरकारच्या उत्पन्नात १०० कोटींवरून ३०० कोटींपर्यंत वाढ झाली आहे”, अशी माहिती अजित पवारांनी सभागृहात दिली.

“जन्माला आलो, तेव्हापासून थेंबालाही स्पर्श केला नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना आपल्यावर जबाबदारी आल्यामुळे राज्याच्या हिताचा आणि उत्पन्नाचा विचार करावा लागतो त्यासाठी हे केलं, असं अजित पवार म्हणाले. “ज्या दिवशी जन्माला आलो, तेव्हापासून आजपर्यंत एका थेंबाला स्पर्श केला नाही हे सगळ्यांना माहिती आहे. राज्याच्या उत्पन्नाचा विचारही करावा लागतो”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

विरोध असेल, तिथे वाईन विक्री नाही..

दरम्यान, वॉक-इन स्टोअर्स, मॉल, सुपमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास जर संबंधित दुकान-मालकाचा विरोध असेल, तर तिथे या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. राज्यात ४०० ते ५०० मॉलमध्येच वाईन विक्री केली जाईल. ज्यांची संमती नसेल, तिथे ठेवलं जाणार नाही. शिवाय अजूनही आम्ही ते केलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले. “जनतेला जर ते नको असेल, तर आमची आग्रहाची भूमिका अजिबात नाही. नागरिकांना नको त्या सवयी लागाव्यात, वेगळा समाज निर्माण व्हावा अशी भावना कुणाचीही नसते”, असंही त्यांनी नमूद केलं.

“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?” संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत निशाणा!

“पेताड असेल, तर त्याला दारू मिळतेच”

दरम्यान, दारू घ्यायचीच असेल तर घेणारा कुठूनही शोधून काढतो, हे सांगताना अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली. “गेल्या अनेक वर्षांत मी अनुभव घेतलाय. एखादा पेताड असला, तरी तो कुठल्याही गावात असू द्या, आपल्याला त्या गावातली दारूची दुकानं माहिती नसतात. तरी ते पेंगतच येतंय रात्री. त्याला विचारलं कसं रे? तर म्हणतो आलो जाऊन”, असं म्हणत अजित पवारांनी झिंगलेल्या माणसाची नक्कल देखील केली.

“होय आमच्याकडे पुरावा आहे, दिशा सालियानची हत्याच झाली”, भाजपा आमदार नितेश राणेंचा विधानसभेत दावा!

“त्याला कशी ती मिळते त्याचं त्यालाच माहिती. पिणारा माणूस अजिबात चुकत नाही. अध्यक्ष महोदय, तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही ज्या भागातलं प्रतिनिधित्व करता, तिथल्या लोकांचा अनुभव तुम्हाला आहे. मोहाची दारू का काय म्हणतात ते. कृपया गैरसमज करून घेऊ नका”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks objection on wine sell liquor in mall supermarket by bjp pmw