Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेची लगबग सुरू होणं आवश्यक होतं. पण त्यानंतरही जवळपास १० दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरण्यासाठी लागले. अखेर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी रीतसर पार पडला. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांचीच पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोले लगावतानाच लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला.
राहुल नार्वेकर यांची आज विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली. पण यात अध्यक्षांचं अभिनंदन करतानाच एकमेकांना टक्केटोणपे देण्याची संधी दोन्ही बाजूंनी साधली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या भाषणात विरोधकांना पराभव मान्य करण्याचं आवाहन केलं.
काय म्हणाले अजित पवार?
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी पक्षफुटीचा उल्लेख केला. “महाराष्ट्रात कायदेशीर पेच निर्माण झाला, तेव्हा उभ्या भारताचं लक्ष इकडे लागलं होतं. विरोधकांनी तेव्हा ताळतंत्र सोडून अध्यक्षांवर टीका केली होती. पण तरीही राहुल नार्वेकरांनी ऐतिहासिक असा निकाल तेव्हा दिला होता. तेव्हा एक नव्हे तर दोन राष्ट्रीय पक्षांत फूट पडली. हा मुद्दा संविधानिक, न्यायिक, संवेदनशील होता. पण त्याचा अध्यक्षांनी बारकाईनं अभ्यास केला”, असं म्हणत अजित पवारांनी राहुल नार्वेकरांचं कौतुक केलं.
विरोधकांना संविधानावरून टोला
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी विरोधकांना संविधानाच्या मुद्द्यावरून टोला लगावला. “निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे. पण संविधान हातात घेतल्यानंतरच संविधानाबद्दल आदर असतो का? जे हातात संविधान घेत नाहीत, त्यांना आदर नसतो का? पण त्यांनी एक तर नुसतंच त्यांनी हातात घेतलं. तरतुदी वाचल्या नाहीत असं माझं मत आहे. किंवा वाचून ते त्या तरतुदींचं उल्लंघन करत आहेत. प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यानं स्थानावर बसण्यापूर्वी शपथ घेणं आवश्यक आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे”, असा दावा अजित पवारांनी केला.
पाहा विधानसभा अधिवेशन कामकाजाचा व्हिडीओ!
“मारकडवाडीत स्टंटबाजी”
मारकडवाडीत ग्रामस्थांनी पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न केला. पण तो स्टंट होता असं अजित पवार म्हणाले आहेत. “संविधानानं निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. सामान्य जनतेला तो अधिकार नाही. एखाद्या सदस्याच्या निवडीला आव्हान निवडणूक याचिका दाखल करूनच देता येतं. उगीच काहीतरी स्टंटबाजी केली गेली. मारकडवाडीसाठी आम्हालाही प्रेम-जिव्हाळा आहे. एकतर विरोधकांनी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे. तुम्हाला जनतेनं नाकारलं आहे. ४८ टक्के मतं महायुतीला मिळाली असून ३३ टक्के मतंच फक्त विरोधकांना आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
ईव्हीएमवरून टोला
“लोकसभेच्या निकालात ईव्हीएम गारगार वाटायचं. चांगलं वाटायचं. आता गारगार वाटतंय की गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा”, असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.
“महाराष्ट्रात महायुतीचे २३७ आमदार निवडून आले. अनेकांच्या लाटा येऊन गेल्या. पण इतकं निर्विवाद बहुमत कुणाला मिळालं नव्हतं. आता विरोधकांनी मान्य करायला हवं. डोळे उघडायला हवेत. लोकही म्हणतील यांचं काय चाललंय. किती दिवस रडीचा डाव खेळणार आहेत. खुल्या मनाने आम्ही लोकसभेला मान्य केलं. मग तिघांनी मिळून ठरवलं की पुन्हा लोकांच्या समोर जायचं आहे. त्यातून लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथे बसवलं आहे. जे आहे ते आहे”, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.