राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुणाला निवडून येण्यासाठी कुणी मदत केली आणि कुणासाठी कुणी प्रचारसभा घेतल्या या मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. यासंदर्भात आज अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलेलं सूचक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. विशेष म्हणजे व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे राजकीय तर्त-वितर्कांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुंदोपसुंदी चालू असताना पुण्यात नगरसेवकांना कुणी निवडून आणलं, हा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केला. “इथे मीच अनेक नगरसेवकांना निवडून आणलंय. काहींना चंद्रकांत पाटलांनी निवडून आणलंय. म्हणजे दोन्ही दादांनीच लोकं निवडून आणली आहेत. बाकी कुणी आलेलं नव्हतं. एकतर भाजपाचे तरी दादा किंवा राष्ट्रवादीचे तरी दादा”, असं अजित पवार म्हणाले.

“इथल्या आरोग्य व्यवस्थेबाबत इतरांनीही प्रयत्न केला. पण त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही. दोन वर्षांत आम्ही ठरवलं. मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो की आपल्याला मर्यादित वेळेत हे करायचंय. त्यातून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा पर्याय पुढे आला”, असंही अजित पवारांनी नमूद केलं. तसेच, भाषणाच्या शेवटी “तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना निवडून आणायचंय”, असंही ते म्हणाले.

सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर!

दरम्यान, अजित पवारांनी भाषणात मांडलेल्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंनी नंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं. “पुण्यात पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. हीच शरद पवारांची खासियत आहे. शरद पवारांनी खूप तरुण टीम उभी केली. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. शरद पवारांनी त्या त्या जिल्ह्याची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला पूर्ण निर्णय स्वातंत्र्य दिलं होतं. प्रचाराला आम्ही सगळेच आलो होतो. पण निर्णय प्रक्रियेत कधीही ढवळाढवळ केली नाही हे आज सिद्ध झालं. मी अजित पवारांचे आभार मानते की त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं की त्यांना निर्णयांचं किती स्वातंत्र्य होतं आणि त्यानुसार ते निवडणुका लढले”, अशी खोचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

आधी सुप्रिया सुळेंची मागणी, लागलीच अजित पवारांचं भाषणात प्रत्युत्तर; पुण्यात एकाच व्यासपीठावर दोघांमध्ये सवाल-जवाब!

एकाच व्यासपीठावर, तरीही संवाद नाही

पुण्यात मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी व्यासपीठावर सुप्रिया सुळे व अजित पवारांच्या मधल्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस बसले होते. संपूर्ण कार्यक्रमात अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यात कोणताही संवाद झाल्याचं पाहायला मिळालं नाही. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळेंनी नंतर “ते गडबडीत होते, त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे बोलायची संधीच मिळाली नाही”, असं विधानही केलं.

सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांचं उत्तर

आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारकडे केली. त्यापाठोपाठ लागलीच अजित पवारांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच “या निवडणुका राज्य सरकारमुळे नव्हेत, तर सर्वोच्च न्यायालयातील ओबीसींसंदर्भातल्या प्रलंबित मुद्द्यामुळे झालेल्या नाहीत”, असं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे दोघांमध्ये प्रत्यक्ष संवाद झालेला नसला, तरी अशा प्रकारे अप्रत्यक्ष सवाल-जवाब मात्र रंगल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks pune mp supriya sule on corporation elections pmw