राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केल्यानंतर त्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींनी शरद पवारांना राजीनामा मागे घेऊन अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली आहे. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी भावनिकही झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी मागितला आहे. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारणा करताच त्यांनी मिश्किल शब्दांत उत्तर दिलं.
शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन!
अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह काही नेत्यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शरद पवारांनी फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ मागितला आहे. याची माहिती अजित पवारांनी पत्रकारांना दिली. “रक्तानं पत्र वगैरे लिहिणं शरद पवारांना अजिबात आवडणार नाही. कुणीही मुंबईत येण्याचा प्रयत्न करू नये. जे कुणी राजीनामे देत आहेत, त्यांचा एकाचाही राजीनामा स्वीकार केला जाणार नाही. अजिबात नवीन प्रश्न निर्माण करू नका. उपोषणाला बसणं वगैरे करू नका. हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नासाठी ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा सामान्य नागरिकांना वेठीस धरता कामा नये, या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
आठवड्याभरापूर्वीच शरद पवारांनी घेतला होता निर्णय
दरम्यान, ७ ते ८ दिवस विचार केल्यानंतरच निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. मी स्वत: यावर ७ ते ८ दिवस विचार केल्यानंतर ही भूमिका पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर ठेवली आहे. त्यावर अशी प्रतिक्रिया येईल असा विचारच मी केला नव्हता. त्यासंदर्भात विचार करून मी बोलेन असं शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. “आम्ही त्यांना म्हटलं की तुमची इच्छा असेल तर आपण कार्याध्यक्ष नियुक्त करू, पण तुम्ही अध्यक्ष राहा”, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवारांना याबद्दल माहिती होतं?
दरम्यान, १ मे रोजी हे होणार होतं, पण वज्रमूठ सभेमुळे आज हा कार्यक्रम घेण्यात आला, या अजित पवारांच्या विधानाच्या संदर्भात माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारणा केली. कुटुंबीयांना शरद पवारांनी या निर्णयाबाबत सांगितलं होतं का? असा प्रश्न काही हिंदी पत्रकारांनी विचारला असता त्यावर अजित पवारांनी हिंदीतूनच मिश्किल टिप्पणी केली.
“मैंने किसी को नहीं बताया. ये सब राँग है. क्या कुछ भी बात करते हो? अरे मेरा पीछा झोड दो बाबा. बार बार मेरे पीछे क्या लगे हो? ऐसा कुछ नहीं बताया”, असं अजित पवार म्हणाले.
…म्हणून कार्यक्रम २ मे रोजी घेतला!
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विनंतीनंतर कार्यक्रम २ मे रोजी घेतल्याचं अजित पवार म्हणाले. “१ तारखेला आमचा हा कार्यक्रम होता. पण १ तारखेला कामगार दिनाचं झेंडावंदन असतं. आमच्या आमदारांनी सांगितलं की १ मेला आम्हाला झेंडावंदन करण्याची संधी मिळते. त्यामुळे कार्यक्रम २ तारखेला कार्यक्रम केला जावा. त्यामुळे हा कार्यक्रम २ तारखेला घेतला गेला”, असं अजित पवार म्हणाले.
Video: अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं केलं समर्थन; रडणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत म्हणाले…!
“आता काय ५० वेळा तेच सांगू का?”
या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पत्रकारांनी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न विचारताच ते संतापले. “मी राष्ट्रवादी सोडणार नाही हे किती वेळा सांगू? ५० वेळा तेच सांगू का? दुसरे कुणीही तशी काही चर्चा करत असले, तर त्या चर्चेला किंमत देऊ नका”, असं अजित पवार म्हणाले.