राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावासाठी सर्वश्रुत आहेत. काही वेळा त्यांनी केलेल्या अशाच मिश्किल आणि हजरजबाबी विधानांमुळे ते अडचणीतही आले आहेत. मात्र, अजित पवार यांनी केलेल्या अशा विधानांची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळते. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. यावेळी पत्रकार परिषदेच्या शेवटी चंद्रकांत पाटलांच्या एका मुद्द्यावर उत्तर देताना अजित पवारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खोचक टोला लगावल्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!
नेमकं घडलं काय?
चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले असता त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणं वाजवणाऱ्या डीजेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा मुद्दा पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवारांनी याच चुकीचं काय झालं? असा उलट प्रश्न केला. मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे वाद उकरून काढले जातात, असंही अजित पवार म्हणाले. या वादांमुळे महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजित पवारांनी केला.
दरम्यान यावेळी पत्रकारांनी ‘लाव रे ते गाणं’ अशा चर्चा झाल्याचं म्हणताच अजित पवारानी त्यावरून राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दांत टोला लगावला. “जाऊ द्या आता.. जे म्हणायचे लाव रे तो व्हिडीओ त्यांचे काही महिन्यापूर्वी किंवा वर्षांपूर्वीचे विचार काय होते आणि आता काय आहेत ते बघा. आता काय, कुणाबद्दल न बोललेलंच बरं”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
महात्मा गांधींच्या फोटोवरून वाद, अजित पवार म्हणतात..
चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा की दुसऱ्या कुणाचा, यावरून सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात आधी अरविंद केजरीवाल यांनी गांधीजींऐवजी देवी-देवतांचे फोटो तिथे असावेत, अशी मागणी केल्यानंतर शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोंचीही मागणी करण्यात आली. यावर पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा…”, अजित पवारांचं राज्य सरकारवर टीकास्र!
“तुम्हाला तरी पटतं का हे? देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण आहोत. महात्मा गांधींचा हसरा फोटो प्रत्येक नोटेवर आहे. आता मध्येच काहीतरी नवीनच कल्पना काढतात. त्यानं महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे का? त्यानं जनतेचे सगळे प्रश्न सुटणार आहेत का? जे महत्त्वाचं आहे ते बघा ना. ७५ वर्षांमध्ये हा प्रश्न कधी आला नाही. देशातला हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे का? हे प्रत्येकानं स्वत:च्या मनाला विचारावं. काय नवनवीन गोष्टी काढत असतात. लोकांना मदत होणाऱ्या प्रश्नांवर बोललंच जात नाही. महात्मा गांधींचा फोटो आहे. चांगलं चाललंय”, असं अजित पवार म्हणाले.