पंढरपूर : पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुराया चरणी केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय कटुता सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक; बारामतीमधून पवार विरुद्ध पवार, असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवार कुटुंबांनी एकत्र यावे यासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या मातोश्रींनी पांडुरंगाचे दर्शन घेतले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज सकाळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता, विठ्ठलाकडे काय मागणं मागितलं, असे विचारले असता आशाताई पवार यांनी, सर्व पवार कुटुंबं एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केली. तसेच राज्यातील जनता सुख-समाधानाने राहू देत, अशीही दोन्ही हात जोडत प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया आशाताई यांनी माध्यमांसमोर दिली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक भक्तगण पंढरीत दाखल झालेले आहेत आणि सावळ्या विठुरायाच्या चरणी नवीन वर्षाचे संकल्प, तसेच त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी राज्यातूनच नव्हे, तर परराज्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.