सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षाकडून राज्यातील वेगवेगळ्या समस्यांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केला जात आहेत. तर विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला सत्ताधारीही तेवढ्याच क्षमतेने उत्तर देत आहेत. विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान एकीकडे अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार नागपूरहून मुंबईला जाणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासाठी खास शासकीय विमानाची सोय करणार आहेत. याविषयी खुद्द अजित पवार यांनीच माहिती दिली असून त्यांनी मुंबईला जाण्याचेही कारण सांगितले आहे. ते आज (२८ डिसेंबर) नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
हेही वाचा >> तुनिषा शर्माचा मृत्यू लव्ह जिहादमुळे? काका पवन शर्मांनी केला मोठा दावा, म्हणाले “हे प्रकरण १०० टक्के…”
“मला मिळालेल्या माहितीनुसार आमदार अनिल देशमुख यांना जामीन मिळालेला आहे. आज ते तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांनी सांगलीतून मुंबईत यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. माझाही मुंबईत जाण्याचा प्रयत्न आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>चीनमधील करोना उद्रेक कशामुळे? कोविड पॅनेलचे प्रमुख अरोरा यांनी सांगितलं, म्हणाले “तेथे चार…”
“माझे आज मुंबईला जाण्याचे नियोजन असतानाच उद्या आपण कामकाज सल्लागार समितीची आपण बैठक घेत आहोत, असे मला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ही बैठक २८ डिसेंबर रोजी घेण्याऐवजी २९ डिसेंबर रोजी घ्यावी, अशी मी त्यांना म्हणालो. मला आज मुंबईकडे निघायचे असल्यामुळे मी तशी विनंती केली होती. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ऐवजी १० वाजताच आपण ही बैठक घेऊ, त्यानंतर तुमचे मुंबईतील काम करून परत या असे मला शिंदे यांनी सुचवले. याच कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आणि मी माझ्या नियोजनात बदल केला. मी आता दुपारी २ वाजता मुंबईला जाणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
“शासनाचे विमान कोणी वापरावे हा निर्णय सर्वस्वी शासनाच्या प्रमुखांचा असतो. मी विरोधी पक्षानेता आहे. मला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. आम्ही सरकारमध्ये असताना प्रसंगानुसार एकमेकांना सहकार्य करायचो. मी दुपारी १ वाजता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विमानाने मुंबईत जाण्याची शक्यता आहे. त्याच विमानाने परत येण्याचे माझे नियोजन आहे,” असेही अजित पवार यांनी सांगितले.