गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर महाराष्ट्रभर लागलं होतं. या बॅनरबाजीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच सोमवारी ( ८ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. कोणाला वाटत नाही, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदेंनी नेमकं काय म्हटलं?
“आम्हाला आमच्या पक्षाचे नेते म्हणून अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं. अजित पवारांमध्ये ती पात्रता, क्षमता आणि योग्यता आहे. शरद पवारांप्रमाणे अजित पवार सकाळी ७ पासून काम करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि अभ्यास असलेला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा राष्ट्रवादीतील लोकांची सुद्धा आहे. पण, शरद पवार आणि महाविकास आघाडी याबाबत निर्णय घेईन,” असं शशिकांत शिंदेंनी सांगितलं.
हेही वाचा : “ठाकरे आणि पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या…”, सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप
“महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला, तर येणारा मुख्यमंत्री तिन्ही पक्षातील असेल. त्यात अजित पवारांना संधी मिळाली, तर महाविकास आघाडी आणखी मजबूत होईल,” असंही शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. ते गोंदियात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. शशिकांत शिंदेंनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केलीय, असा प्रश्न विचारल्यावर मुनगंटीवार म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर काही अडचण नाही. पण, झाले नाहीतर अजित पवारांनी स्वत:च्या नावासमोर मुख्यमंत्री लावावं.”
“कारण, मुख्यमंत्री नावासमोर लावल्याने गुन्हा दाखल होतो, असं संविधानात लिहिलं नाही. कोणी कोणी आपल्या मुलाचं नाव पद्मश्री ठेवतात. तसे अजित पवारांनी करावं. स्वत:चे नावही बदलूनही घेता येते,” अशी मिश्कील टिप्पणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे.
‘शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून, बदल्यांचे रेट ठरवले जात आहेत,’ अशी टीका अजित पवारांनी साताऱ्यात बोलताना केली आहे. याबद्दल विचारल्यावर मुनगंटीवार म्हणाले, “अजित पवारांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलावे, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. ज्यांच्या चौकशा सुरू होत्या, त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलावे, यापेक्षा २१ शतकातील मोठा जोक असू शकत नाही.”