रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १६ गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यापैकी ६ गावांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे उरलेल्या १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झाले.
दापोलीत शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी परंपरागत पकड कायम ठेवली आहे, राजापूर मतदारसंघातील लांजा तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या पदाधिकाऱ्यांनी पोटनिवडणुकीत बाजी मारत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना शह दिला आहे. पण बिनविरोध झालेल्या जुवे जैतापूर ग्रामपंचायतीवर आमदार साळवी यांनी दावा केला आहे.
दापोलीमध्ये कवडोली, मांदिवली, बांधतिवरे व डौली या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यातील डौली सरपंचपदी हरिश्चंद्र महाडीक, कवडोली सरपंचपदी प्रदीप चिंचघरकर हे विजयी झाले आहेत, तर बांधतिवरे आणि मांदिवली सरपंचपद रिक्त असले तरी सदस्य आमदार कदम यांच्या गटाचे आहेत. चारही ग्रामपंचायतींवर शिवसेनेकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे मंडणगडमध्ये दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी उन्हवरेमध्ये गावपॅनल विजयी झाले असून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा केला आहे, तर वाल्मीकीनगर ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने दावा केला आहे.
हेही वाचा >>> आकडय़ांची उधळण, यशाचे ढोल; २३५९ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर; सर्वच पक्षांचे वर्चस्वाचे दावे
चिपळूण तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांनी तीनही ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात यश आले आहे. टेरवमध्ये किशोर कदम यांनी सरपंचपदी विजय मिळवला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे चिपळुणातील नेते माजी आमदार रमेश कदम यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे . कालुस्ते खुर्द व कालुस्ते बुद्रुक या दोन्ही ग्रामपंचायतींवर आमदार निकम यांच्या सहकार्यानी बाजी मारली.
संगमेश्वरमध्ये तळेकांटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सुषमा बने यांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली आहे.
राजापूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने वर्चस्व राखले आहे. मोसम येथील एकमेव जागेसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या पार्वती सरवणकर या विजयी झाल्या आहेत, तर सार्वत्रिक निवडणूक झालेली जुवे-जैतापूर ग्रामपंचायत आणि पोटनिवडणूका जाहीर झालेल्या सर्व, ९ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तालुक्यातील १० जागांसाठी पोटनिवडणूक आणि जुवे जैतापूर येथे सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. त्यापैकी पोटनिवडणूका होत असलेल्या हसोळतर्फ सौंदळ येथे प्रभाग-१ मध्ये प्रतिमा कदम, ओझर येथील प्रभाग-३ मध्ये प्रज्ञा कुळकर्णी, कुवेशी येथे प्रभाग-२ मधून एकांती देवकर, मंदरूळ येथील प्रभाग-१ मध्ये संचिता मासये, गोवळ येथे प्रदीप जोशी, शुभांगी मयेकर, प्रगती मांडवकर, संजय जाधव आणि मेघा बंडबे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. कमी लोकसंख्या असलेल्या जुवे-जैतापूर या एकमेव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आराध्या सरपोळे, तर सदस्य म्हणून शिवदास करंजे, दर्शना सरपोळे, विश्वनाथ कांबळी, स्वप्निल कांबळी, शिवानी करंजे, संतोषी करंजे, ज्योती कांबळी यांची निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे.