Ajit Pawar NCP : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांसह इतर पक्षांच्याही उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. आज (२५ ऑक्टोबर) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका तासात चार मोठे पक्षप्रवेश झाले आहेत. तसेच पक्ष प्रवेश होताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांचा महाविकास आघाडीला हा अप्रत्यक्ष इशारा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणाचा पक्षप्रवेश झाला?

सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील, आमदार झिशान सिद्दिकी, सांगलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर लगेचच या चारही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा : मविआनं तिकीट नाकारलं, झिशान सिद्दिकी आता अजित पवार गटातून आदित्य ठाकरेंच्या भावाला टक्कर देणार

कोण-कोणाच्या विरोधात लढणार?

संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील

माजी खासदार संजय काका पाटील यांना तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील (Rohit Patil)हे उमेदवार आहेत. त्यामुळे आता संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे.

झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत होणार आहे.

जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील

भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेश करताच निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर इस्लामपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उमेदवार आहेत. त्यामुळे आता इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी लढत होणार आहे.

प्रताप चिखलीकर लोहा कंधारमधून लढणार

भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आता लोहा कंधार मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहेत.

सना मलिक अणुशक्तीनगरमधून लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आज सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar ncp joined four big leaders sanjay kaka patil mla zeeshan siddiqui nishikant patil and pratap patil chikhlikar joined ncp gkt