राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि सडेतोड स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या विधानांची जशी चर्चा होते, तसेच ते काही वेळा अडचणीतही आल्याचं दिसून आलं आहे. मात्र, अजित पवारांच्या मिश्किल स्वभावामुळे त्यांनी दिलेली उत्तरं किंवा विधानं चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच साताऱ्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना अजित पवारांनी खोचक शब्दांत टोलेबाजी केली. मुख्यमंत्र्यांना बोलताना चिठ्ठीतून येणाऱ्या संदेशांवरूनही त्यांनी टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी मदतीवरून टीका

अजित पवारांनी यावेळी बोलताना शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं. “अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पूर आले नद्यांना. गारपीट झाली. फळबागांचं, बारमाही पिकांचं नुकसान झालं. म्हणे आम्ही मदत करणार. आरे कधी करणार? त्या शेतकऱ्याचा अंत किती बघताय? त्याची सहनशीलता संपली ना. कधी करणार तुम्ही मदत? त्यासाठी तिथे बसून काम करून घ्यावं लागतं. लोकांना अजिबात मदत होत नाहीये. सरकार ढिम्म आहे. आमदार निधी वाटपालाही स्थगिती दिली. काय कारण आहे? मी आमदार निधी १ कोटीवरून ५ कोटीपर्यंत वाढवला. आम्ही सगळ्या आमदारांना निधी दिला”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

जाहिरातबाजीवरून टोला

दरम्यान, राज्य सरकारकडून जाहिरातबाजीवर करण्यात येणाऱ्या खर्चावर अजित पवारांनी यावेळी बोट ठेवलं. “तुमच्या पैशांमधून सरकारची जाहिरातबाजी चालू आहे. पहिल्या पानावर जाहिराती झळकतात. मुंबईला तुम्ही आलात तर बेस्ट बसेसवर यांचेच फोटो असतात. एखाद्याची बघायची इच्छा नसली तरी बघायलाच लागेल असं म्हणतात. कारण डोळे बंद करून तर गाडी चालवता येत नाही”, असा टोला अजित पवारांनी लगावला.

“मी नाव घेत नाही, अन्यथा मला…”, बाजार समितीच्या निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान

“मला चिठ्ठी द्यायचं धाडस कुणी करेल का?”

मुख्यमंत्र्यांना बोलताना चिठ्ठी देण्यावरून अजित पवारांनी यावेळी टोलेबाजी केली. “मुख्यमंत्री काय बोलतात त्यांचं त्यांना तरी कळतं की नाही कुणाला माहिती. त्यांना मध्येच कुणीतरी चिठ्ठी आणून देतंय. त्यामुळे सांगायचं राहातं बाजूला, ते चिठ्ठीच वाचत राहतात. पहिला मुद्दा राहतो तसाच. पुन्हा इकडून दुसरी चिठ्ठी. मला चिठ्ठी द्यायचं कुणी धाडस तरी करेल का ओ? त्याच्याकडे बघायचो नाय का मी. अरे मुख्यमंत्र्यांनी एखादी नोट घ्या ना. छोटी नोट घ्या. पॉइंट घ्या. त्या पॉइंटवर बोला. तुमचा अपमान तो आमचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या १३-१४ कोटी लोकसंख्येचा अपमान आहे. याचं काही तारतम्यच नाहीये”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar ncp mocks cm eknath shinde devendra fadnavis pmw