राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा सभांमधून व पत्रकार परिषदांमधून अजित पवारांनी केलेली खुमासदार टोलेबाजी चर्चेचा विषय ठरते. काही प्रसंगी तर अजित पवारांना आपल्या विधानांमुळे अडचणींचादेखील सामना करावा लागला आहे. मात्र, तरीही सभांमधील त्यांच्या अशा खुमासदार टोल्यांवर श्रोतेमंडळींसह व्यासपीठावरील नेतेमंडळीही दिलखुलास दाद देताना दिसतात. आज पाथर्डीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांच्या याच मिश्किल स्वभावाची प्रचिती उपस्थितांना आली.
नेमकं घडलं काय?
सध्या चालू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यातील मुद्दे यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना त्या मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. आज भाषणातही अजित पवारांनी सरकारवर विविध मुद्द्यांच्या आधारे हल्लाबोल केला. मात्र, त्याचवेळी समोर बसलेल्या लोकांमधून एकाने अचाकन दुष्काळी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!
“शेवटी सगळं तुझ्यावरच येतंय बघ!”
या व्यक्तीने अजित पवारांना दुष्काळी अनुदानाबाबत विचारणा केली. “अजितदादा, अजूनपर्यंत या सरकारनं दुष्काळी अनुदान दिलेलं नाही”, असं या व्यक्तीने म्हणताच अजित पवारांनी “आरे ते सांगतायत दिलं होतं. उद्या मी तेच त्यांना विचारणार आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं. मात्र, तरीही या व्यक्तीचं समाधान झालं नाही. त्यानंतरही अजित पवारांच्या बोलण्यात मध्ये बोलत या व्यक्तीने “तुमच्या काळात अनुदान मिळत होतं. या खोके सरकारने अजून अनुदान दिलेलं नाही”, असं म्हणताच अजित पवारांनी त्यावर त्या व्यक्तीलाच मिश्किलपणे सुनावलं. “तू आमदार निवडून दिला असता तर कशाला खोके सरकार निवडून आलं असतं. शेवटी परत तुझ्यावरच येतंय बघ”, असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
“आम्ही म्हणालो होतो की बदला घेऊ, आता आमचा बदला हा आहे की..”, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
“आमचं काम मी टाळत नाही, नाकारत नाही. जी जबबादारी आम्ही स्वीकारली आहे, ती आम्ही तडीस नेणार. पण हे करत असताना आम्हाला तुमचंही सहकार्य पाहिजे. महागाई वगैरे वाढते म्हणून जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय. कुठल्या धर्मानं संगितलंय एकमेकांचा दोष करायला?” असं अजित पवार पुढे म्हणाले आणि त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.