सांगली : अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून मिरजेतील माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आमदारकीची संधी मिळाली असली तरी पक्षिय राजकारणात त्यांची ओळख राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विरोधक म्हणूनच आहे. यातून अजित पवार यांनी मुस्लिम समाजास संधी देतानाच जयंत पाटील विरोधकांना बळ देत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेत एकेकाळी स्व. मदन पाटील यांच्याकडे एकहाती सत्ता होती. मात्र, जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस वगळून आमदार जयंत पाटील यांनी सर्व विरोधी गटाची एकत्रित मोट बांधून विकास आघाडीच्या नावाखाली महापालिकेत सत्तांतर घडवून आणले. त्यावेळी इद्रिस नायकवडी यांना महापौर पदाची संधी मिळाली. मात्र, महापौर होताच नायकवडी यांनी स्वत:चा राजकीय विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा त्यांनी आघाडीच्या राजकारणाला सोडचिठ्ठी देत स्वअस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. स्थायी समिती सभापती निवडीवेळी विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसचे संजय मेंढे यांना सभापती करण्यात पुढाकार घेतला. यामुळे महापालिकेच्या राजकारणात नायकवडी आणि आमदार पाटील यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष सुरू झाला.

हेही वाचा >>> निवडणूक जाहीर होताच मतदानावर बहिष्काराची इशारेबाजी सुरू; हराळवाडी ग्रामस्थांचा पाणी प्रश्नावर इशारा

आता नायवकडी यांना आमदार पदाची संधी केवळ अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून दिली असली तरी यामागे आमदार पाटील यांच्या विरोधकांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. तसेच राष्ट्रवादीचा धर्म निरपेक्ष चेहरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारापुढे जावा हा हेतूही यामागे आहे.

हेही वाचा >>> सोलापुरात ‘एमआयएम’च्या पवित्र्याने  महाविकास आघाडीची डोकेदुखी; शहर, जिल्ह्यात चार जागा लढणार

मिरजेत अल्पसंख्याक समाज तुलनेत अधिक असल्याने ही संधी देण्यात आली असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपपासून मुस्लिम मतदार दुरावल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मिरज विधानसभा मतदार संघामध्ये खा. विशाल पाटील यांना २५ हजारांचे मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी कसोटीचे ठरू शकते. यामुळे मिरजेतील भाजपची जागा सुरक्षित करण्यासाठी भाजपनेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नायकवडी यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यास अनुकूलता दर्शवली असल्याचे मानले जात आहे. एकंदरित जिल्ह्याच्या विशेषत: महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नायवकडी यांनी जमिल बागवान, प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, योगेंद्र थोरात, विष्णु माने आदी माजी नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत महापालिकेच्या राजकारणातच अडकलेल्या नायकवडींना आता राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने मिरजेचे राजकीय महत्त्व वाढणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar ncp nominate mlc to former mayor idris naikwadi to target jayant patil zws