NCP Ajit Pawar Slams Sanjay Raut And MVA : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा महायुतीने धुव्वा उडवला होता. विधानसभेच्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी “मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत”, अशी घोषणाच केली आहे. राऊत यांच्या याविधानानंतर महाविकास आघाडीसह महायुतीतूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
जनतेने त्यांना हाकलून दिले
दरम्यान संजय राऊत यांच्या स्वबळाच्या घोषणेवर राष्ट्रवादीने (अजित पवार) जोरदार टोला लगावत, महाविकास आघाडी उद्ध्वस्त होत असल्याचे लक्षात आल्याने संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रवक्ते प्रशांत पवार म्हणाले की, “संजय राऊत यांना महाविकास आघाडी उद्ध्वस्त होत असल्याची चाहूल लागली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या नागपूर शहरात येऊन मुंबईपासून नागपूरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. ते स्वार्थासाठी एकत्र आले होते. पण, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कायमचे हाकलून दिले आहे.”
हे ही वाचा : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याचे विधान केले होते. ते म्हणाले, “मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद बघायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. एकत्र लढलो तर कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षवाढीला बसत आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात.”
दरम्यान संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटल्यानंतर, महाविकास आघाडीतूनही यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.