मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. “काही ठिकाणी मी आणि मुख्यमंत्री एकत्र तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र दौरे काढणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा हा महाराष्ट्र दौरा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी या दौऱ्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बारामतीमध्ये पवारांच्या घरी आज दिवाळीनिमित्त भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांच्याही भेटी घेतल्या. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीकास्र सोडलं.
“मी तेव्हाच म्हणालो होतो…”
अजित पवारांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आधीच भेटल्याचा संदर्भ दिला. “आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं आहे. ओल्या दुष्काळाबाबत मी स्वत: दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तेव्हाच मी म्हणालो होतो की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकतर सगळ्यांची खरीपाची पिकं गेली. रब्बीचीही पिकं गेली. शेतकऱ्याला आता काय करावं आणि काय करू नये हे सुचत नाहीये. तो इतका चिंतेत आहे की विचारता सोय नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“आजचा सण संपू द्या, उद्या..”
“आज सण आहे. आज कुणावर टीका करून सणाच्या उत्साहावर विरजण घालण्याचं काम मला करायचं नाही. आजचा सण संपू द्या. उद्या त्यावर माझी किंवा पक्षाची भूमिका मांडण्याचं काम आम्ही करू”, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.