गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या कथित प्रकारावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि मंदिरातील प्रथेबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे उरुस काढणारी संघटना आणि त्यांच्यासोबतीने महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अशी प्रथा असल्याचं समर्थन केलं जात असताना हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी तशी प्रथा नसल्याचा दावा केला आहे. काही स्थानिक मंडळींनी तर मंदिर परिसरात गोमुत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ केल्याचाही दावा केला. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये अशी काही प्रथा आहे की नाही, यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली आहे.
नेमकी घटना काय?
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात काही मुस्लीम व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यासंदर्भातले व्हिडीओही व्हायरल झाले. मात्र, मुस्लीम धर्मियांकडून काढण्यात येणारा उरुस आणि त्यानिमित्ताने मंदिरात धूप दाखवण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून असल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे. मात्र, मंदिर प्रशासनाने याविरोधात तक्रार केली असून अशी प्रथा नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, यासंदर्भात पत्रकार परिषदेत विचारणा केली असता अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “कसली प्रथा नाहीये? आपण त्र्यंबकेश्वरला जा. मी हिरामण खोसकर, छगन भुजबळांशी बोललो. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांशी बोललो. त्र्यंबकेश्वरच्या स्थानिकांचं म्हणणं आहे की १०० वर्षांची परंपरा चालली आहे. बाहेरच्या बाहेर ते जातात, आत जात नाहीत. हुसेन दलवाई यांनीही तिथे जाऊन बाहेरून दर्शन घेतलं. काही ठिकाणी प्रथा असतात”, असं अजित पवार म्हणाले.
“काही स्थानिक परंपरा असतात”
“आमच्याकडे कण्हेरीत प्रचाराचा शुभारंभ आम्ही मारुतीरायाला नारळ फोडून करतो. पण तिथे महिलांना गाभाऱ्यात जायला परवानगी नाही. हे चालत आलंय, लोक पाळतात. कुणी काय पाळावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण भावनिक मुद्दा करू नका. राजकारण आणू नका. जातींमध्ये तेढ निर्माण होईल असं होता कामा नये असं आमचं आवाहन आहे. त्याबाबत स्थानिक लोकांनीही तसं आवाहन केलं आहे. तिथे वर्षानुवर्षं परंपरा चालू असल्याचं सांगितलं आहे”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
“स्टॅम्प आणा, मी लिहून देतो, मविआ…”, अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले, “अशा चर्चा…!”
“औरंगाबाद, अकोला, शेवगाव आणि त्र्यंबकेश्वर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली झाल्या. काय कारण होतं? आम्ही राजकारणात नव्हतो, तेव्हाही आम्ही कुठे दर्शनासाठी जायचो, तेव्हा तिथे सर्व जाती-धर्माचे लोक दर्शन घ्यायचे. आपल्यात पद्धतच आहे. तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं असेल, गुरुद्वारा, चर्चमध्ये जायचं असेल, दर्ग्यात जायचं असेल, चादर चढवायची असेल तर आपण जातो”, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना दिला सल्ला
दरम्यान, या सर्व प्रकरणात पोलिसांना तपासात मुक्त हस्त द्यावा, असा सल्ला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. “दंगली कंट्रोल होत नाहीयेत. तेढ वाढतेय. गोरगरीबांना त्याची किंमत मोजावी लागतेय. त्यामुळे फडणवीसांनी यात लक्ष घालायला हवं. फडणवीसांनी यात तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना पूर्ण मुभा दिली पाहिजे”, असं ते म्हणाले.