गेल्या काही दिवसांपासून देशात नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. विशेषत: या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देण्यात आलं नसल्यामुळे विरोधकांनी कार्यक्रमावर घातलेल्या बहिष्काराचीही मोठी चर्चा झाली. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य केल्यानंतर त्यावरून आता विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या ‘जमालगोटा’ विधानावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय झालं नेमकं?
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. याला विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र, केंद्र सरकारने निर्णय न बदलल्यामुळे अखेर देशातील २० विरोधी पक्षांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला. आज हा सोहळा पार पडल्यानंतरही दोन्ही बाजूंनी एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
दरम्यान, मोदींच्या हस्ते उद्घाटनाला विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक शब्दांत टोला लगावला होता. “काही लोक विघ्नसंतोषी असतात. अशा कार्यक्रमाला विरोध करणं हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध लोकशाहीला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते त्यांनी सांगावं. त्यांना ही जी काही पोटदुखी सुटली आहे. जनता सुज्ञ आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमाल गोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल”, असं ते म्हणाले. “मराठीत एक म्हण आहे, नावडतीचं मीठही अळणी लागतं, तशी यांची गत आहे. मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं की त्याला विरोध करायचा असा प्रकार सुरू आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“मंत्र्यांनी एक साधा फोन जरी केला असता, तरी…”, सुप्रिया सुळेंची उद्घाटन सोहळ्यावर सूचक प्रतिक्रिया!
एकनाथ शिंदेंच्या या विधानावर माध्यम प्रतिनिधींनी आज पत्रकार परिषदेत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एकनाथ शिंदेंना यशवंतराव चव्हाणांची आठवण करून दिली. “एकनाथ शिंदेंनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सुसंस्कृत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी, बाकीच्या मान्यवरांनी कसं बोलायचं असतं याचे काही संस्कार आपल्यावर केले आहेत. पण हे जमालगोटा वगैरे मुख्यमंत्र्यांना तरी हे शब्द पटतात का?” असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
“जनता ठरवेल, महागाई खरंच कमी झाली का”
“एकनाथ शिंदे सांगतात ना जनता सांगेल वगैरे, मग जनता सांगेलच ना. जनतेनं कर्नाटकात सांगितलंच आहे. पुढेही जनता सांगेल. आपण लोकशाही मानणारे आहोत. उद्या जनतेला ज्यांना केंद्रात पाठवायचंय त्यांना तिथे पाठवतील.राज्यात ज्यांना पाठवायचंय, त्यांना राज्यात पाठवतील. जनता ठरवेल की खरंच महागाई कमी झाली का बेरोजगारी कमी झाली का? लोकांचे प्रश्न सुटले का?” असंही अजित पवार म्हणाले.