बारामतीच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे स्पष्ट दोन गट पडलेले आहेत. अजित पवारांनी बारामती लोकसभेला आपला उमेदवार उतरविणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच या उमेदवाराच्या प्रचारावेळी मी आणि माझे कुटुंबिय वगळता इतर सर्वजण माझ्या विरोधात जातील, असेही अजित पवार म्हणाले होते. पण आता अजित पवार यांच्या कुटुंबातील एक सदस्य बारामतीच्या प्रचारात उतरताना दिसत आहे. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार गटाच्या बारामतीमधील राष्ट्रवादी कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. श्रीनिवास पवार यांनी आपला भाऊ अजित पवार यांना अनेक बऱ्या-वाईट प्रसंगात आजवर साथ दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सख्ख्या पुतण्याने घेतलेली भूमिका अनेकांना बुचकळ्यात टाकणारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युगेंद्र पवार म्हणतात साहेब म्हणतील तसं…

युगेंद्र पवार यांनी आज बारामती दौरा केला असताना पत्रकारांशी संवाद साधला. बारामती लोकसभेसाठी कोणत्या गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता युगेंद्र पवार म्हणाले की, साहेब म्हणतील तंस मी करणार आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार ही अजित पवारांची दोन्ही मुले अजित पवार गटाच्या प्रचारासाठी आधीच मैदानात उतरले आहेत. त्यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, सर्वच भाऊ प्रचाराला उतरले ही चांगली बाब आहे. निवडणुकीसाठी अजून एक महिना बाकी आहे, त्यामुळे पुढे काय होते ते बघू, असंही युगेंद्र पवार म्हणाले.

कुटुंबात अजित पवारांना एकटे पाडलेले नाही

अजित पवार यांना एकटे पाडले जात आहे का? यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, मला वाटत नाही अजित पवारांना एकटे पाडले जात असावे. राजकारण वेगळे आहे आणि कुटुंब वेगळे आहे. तसेच सुप्रिया सुळे या अतिशय चांगल्या खासदार असल्याचेही युगेंद्र पवार म्हणाले.

रोहित पवारांनी हवेत जाऊ नये म्हणून युगेंद्र पवार मैदानात

युगेंद्र पवार बारामतीच्या प्रचारात उतरण्याने अजित पवारांच्या गटाला काहीही फरक पडत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मांडली. “युगेंद्र – जोगेंद्र असे कुणीही आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. उलट शरद पवारांच्या गटातील नेते रोहित पवार हवेत जाऊ नये, म्हणून कदाचित साहेबांनीच युगेंद्र पवारला पुढे आणले असावे”, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar nephew yugendra pawar likely join hands with sharad pawar faction kvg
Show comments