गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवारांसह आमदार आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातही भेट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जयंत पाटील म्हणाले, “येणाऱ्या कार्यकर्त्याला तू भेटू नको, असं सांगण्याचा प्रकार नाही. कार्यकर्त्याचं स्वागत करून त्यांचं मत शरद पवार ऐकून घेतात. म्हणून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते वेगवेगळ्या सल्ल्यांसाठी शरद पवारांकडे येतात.”
हेही वाचा : “आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत”, भरत गोगावलेंच्या विधानावर बच्चू कडू म्हणाले…
“पण, हा कसा काय भेटला? तो कसा काय भेटला? असे समजून लोक बऱ्याचवेळा गैरसमज करतात. मात्र, शरद पवार कोणाच्याही मागे गेले नाहीत. शरद पवार सर्व नेते आणि व्यक्तींबरोबर आदराने वागतात. त्यामुळे शरद पवार कोणाला आणि कितीवेळा भेटले, तरी मनात शंका बाळगण्याचं कारण नाही,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा : “महामानवांबद्दल कुठलंही बेताल वक्तव्य करता कामा नये, याबद्दलची…”; शिंदे-फडणवीसांसमोर अजित पवारांचं वक्तव्य
‘एकनाथ शिंदेंना डावलून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं, तर वाईट परिणाम होतील’, असं विधान बच्चू कडू यांनी केल्याबद्दल जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने विचारलं. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार उपमुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आता तरी नाही. त्यामुळे प्रश्न उद्भवल्यावर बोलणं योग्य राहिल.”