Ajit Pawar : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्यामध्ये टाळाटाळ केल्याचा आरोप करत संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन करत तब्बल ९ तास रेल्वे मार्ग रोखून धरला होता. त्यामुळे ९ तासांपेक्षा जास्त वेळ रेल्वेसेवा ठप्प होती. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेची चौकशी आता एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे.
बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशा नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असा दरारा निर्माण झाला पाहिजे की परत अशा प्रकारचं कृत्य करण्याचं कोणाचं धाडस झालं नाही पाहिजे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. तसेच काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. अशा प्रकारची घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये. पण अशा प्रकारच्या घटना आमच्या कानावर आल्यानंतर आम्हाला देखील वाटतं की, त्या घटनांचा तातडीने तपास व्हायला हवा. तपास करून असल्या नराधमांना तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. असा दरारा निर्माण झाला पाहिजे की परत कुणाचं धाडस होता कामा नये”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बदलापूरमध्ये काय घटना घडली?
बदलापुरातील एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी लवकर गुन्हा दाखल करुन घेतला नाही, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी संबधित शाळेच्या समोर पालकांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या देत तब्बल ९ तास बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन केल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर पोलिसांनी सातत्याने आवाहन करूनही आंदोलक हटत नव्हते. रेल्वे पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सह स्थानीक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. यामुळे जवळपास नऊ तास रेल्वे मार्ग ठप्प होता. पोलिसांनी अखेर आंदोलकांवर लाठी चार्ज करत रेल्वे मार्ग मोकळा केला. त्यानंतर आंदोलनामुळे ठप्प झालेली रेल्वे सेवा अखेर १० तासानंतर सुरळीत झाली होती. दरम्यान, बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.