भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच महाविकास आघाडीची खिल्ली उडवली होती. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे १० दावेदार आहेत. २०२४ पर्यंत यामध्ये आणखी दोन नेत्यांचा समावेश होईल, अशी टीका बावनकुळेंनी केली होती. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवार आहेत, असंही बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळेंच्या या विधानावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोलेबाजी केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे १० दावेदार असतील, तर त्यात काय बिघडलं? यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना वाईट वाटायचं कारण काय? अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “छगन भुजबळांचं बरोबरच आहे”, प्रदेशाध्यक्षपदाबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा दावेदार आहेत, या बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “मविआत मुख्यमंत्री पदाचे दहा दावेदार असतील तर मग काय बिघडलं? त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना वाईट वाटायचं कारण काय? २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं, तेव्हाही ५ ते ६ लोक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. आता मी त्यांची नावं घेत नाही. पण काही नेते म्हणाले होते, मी ‘मास लीडर’ नाही. मी ‘मेट्रो लीडर’ नाही. आता हे सगळं काढायला नको, जे झालं ते गंगेला मिळालं.”
हेही वाचा- “महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे १० दावेदार”, थेट नावं घेत बावनकुळेंनी उडवली खिल्ली!
‘कितीही विरोधक एकत्र आले तरी त्यांना १५० च्या वर जागा जिंकता येणार नाहीत’ या बावनकुळेंच्या वक्तव्याचाही अजित पवारांनी समाचार घेतला. “त्यांना (चंद्रशेखर बावनकुळे) म्हणावं, एवढं तुम्हाला वाटतं तर बोलून कशाला दाखवता. शेवटी कितीही काही म्हटलं तरी, मत विभागणी न होण्यासाठी काहीजण एकत्र आले आहेत. मी परवा माझ्या भाषणातही सांगितलं की, मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे आमच्या ४० ते ५० जागा कमी आल्या होत्या. खासदारकीच्या जागाही गेल्या होत्या. त्यामुळे उगीच ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं, याला काहीही अर्थ नाही. जे खरं आहे, ते सांगा” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.