Ajit Pawar On Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी झाला. मात्र, या मंत्रिमंडळात काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही डावलण्यात आलं. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली. एवढंच नाही तर छगन भुजबळ यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत पुढील भूमिका घेण्याच्या संदर्भातही सूचक भाष्य केलं. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर नाव न घेता मोठं भाष्य केलं. “काही मान्यवरांना आपण थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला”, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.
अजित पवार काय म्हणाले?
“मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी आपण काही नावं मंत्रिपदासाठी दिली. तेव्हा त्यामध्ये काही मान्यवरांना आपण थोडसं थांबायला सांगितलं. मात्र, त्यानंतर काहींनी रोष व्यक्त केला. आता वास्तविक काही नवीन लोकांनाही मंत्रिमंडळात संधी द्यावी लागते. तसेच कधी-कधी आपण जुन्या नेत्यांना या ठिकाणी संधी न देता केंद्रात कशी संधी देता येईल? याबाबतही विचार केलेला आहे. ज्यांना वाटतं की योग्य मानसन्मान दिला गेला पाहिजे. तो मानसन्मान देण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही”, असं अजित पवारांनी कोणाचंही नाव न घेता म्हटलं. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख हा छगन भुजबळ यांच्याकडे होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवारांच्या विधानावर भुजबळ काय म्हणाले?
आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याबाबत आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, यावेळी अजित पवारांच्या विधानाबाबत भुजबळांना प्रश्न विचारला. ‘काही वरिष्ठांना मंत्रिपद दिलं नाही, याचं कारण तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची असते’, असं अजित पवारांनी म्हटलं. यावर प्रतिक्रिया विचारली असता भुजबळ म्हणाले, “तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तरुणांना संधी द्यायची यासाठी व्याख्या ठरवली पाहिजे. मग त्यामध्ये किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचं? मग ६७ ते ६८ वर्षांपर्यंतही तरुण म्हणायचं का? हे ठरवलं पाहिजे ना?”, असा टोला छगन भुजबळ यांनी नाव न घेता अजित पवारांना लगावला.
पुढची भूमिका काय असेल?
पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांना तुमची पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “माझ्या पुढच्या भूमिकेबाबत तुम्हाला घाई झालेली दिसते. मात्र, मला माझी भूमिका घ्यायला वेळ लागेल. त्यासाठी मी सर्वांशी चर्चा करत आहे”, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं.