गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पक्ष संघटनेत जबाबदारी मिळावी, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली. यानंतर प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना मिळावं, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. भुजबळ यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असं बोललं जात आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ओबीसी नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळावं”, या छगन भुजबळांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “छगन भुजबळांनी का बोलू नये? छगन भुजबळांचा तो अधिकार आहे. उद्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये? त्यामुळे छगन भुजबळ यांचं बरोबरच आहे.”

हेही वाचा- “महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे १० दावेदार”, थेट नावं घेत बावनकुळेंनी उडवली खिल्ली!

तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद मिळालं तर एकहाती कारभार करता आला येईल, असं वाटतं का? यावर अजित पवार म्हणाले, “अरे बाबा, त्यासंदर्भात आम्ही एकत्र बसून बोलू. कोणत्याही पक्षातील नेत्याला आपली मतं मांडण्याचा अधिकार लोकशाहीत असला पाहिजे. शेवटी पक्ष जे ठरवेल, तो निर्णय अंतिम असतो. परंतु तुमचं म्हणणं पक्षाच्या समोर मांडायचंच नाही, असं कसं चालेल? असंही अजित पवार म्हणाले. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- एकनाथ खडसेंनी घेतलेली भेट यशस्वी ठरली? पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत मिटकरींचं मोठं विधान

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

पक्ष संघटनेत पद मिळावं अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले होते, “राज्यात ओबीसी समाज ५४ टक्के आहे. तो समाज आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर जोडला जाऊ शकतो. इतर पक्षांनी त्यासाठीच त्यांचे ओबीसी अध्यक्ष नेमले आहेत. आमच्या पक्षातही ओबीसी नेते खूप आहेत. सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड असे नेते आहे. मला जबाबदारी मिळाली तर मीही काम करेन.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on chhagan bhujbal statement over obc leader should appoint as ncp president rmm