राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘वज्रमूठ’ सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेतून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विविध चुकांचा पाढा वाचला आहे.
‘वज्रमूठ’ सभेत भाषण करताना अजित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला नपूंसक म्हटलं आहे, याची यांना जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही. राज्यात प्रक्षोभक भाषणं होत असताना, दंगली माजवण्याचा प्रयत्न होत असताना ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही ते नपुंसक सरकार आहे, अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा महाराष्ट्राचा कमीपणा नाही का?”
हेही वाचा- “दादा, सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे”, वज्रमूठ सभेत अजित पवारांसमोर संजय राऊतांचं विधान!
“आपण सर्वजण महाराष्ट्रीयन आहोत. आपलीही अशा गोष्टींमुळे शरमेने मान खाली जाते. परंतू नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबद्दल काहीही वाटत नाही. मुख्यमंत्री अलीकडे अनेकदा चुकलेले मी पाहिलं आहे, तुम्हीही पाहिलं असेल. मागे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मुर्मू देशाच्या पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही यांना माहिती नाही.” अशी टीका अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर केली.
हेही वाचा- “असं अपत्य तुम्हाला मान्य आहे का?”, मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा RSSला सवाल
“काल की परवाच काही उद्योगपतींसमोर भाषण सुरू होतं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही मुंबईत ‘साडेतीनशे पन्नास’ किमी मेट्रोलाईन टाकली. आता कशाला साडेतीनशे पन्नास म्हणतात कुणाला माहीत… ते राज्याच्या १३-१४ कोटी जनतेचे प्रमुख आहेत. जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी नोट काढावी आणि ती नोट वाचावी. काही बिघडत नाही. मात्र, साडेतीनशे पन्नास कोटी कशाला म्हणतात? याचं उत्तर शोधताना गणिताचे विद्यार्थी तर तोंडात बोटच घालतील.”
“त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे”
“एकनाथ शिंदेंनी मागे एमपीएससी आणि निवडणूक आयोगातही घोटाळा करून टाकला होता. ते घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.