राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईमधील बीकेसी मैदानात सभा घेतली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. या वेळेस उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीची आठवणही करुन दिली. मात्र याचसंदर्भात आज सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी हात जोडून या प्रश्नावरुन चिडलेल्या स्वरात उत्तर दिलं.
नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारताच अजित पवारांचा संताप; म्हणाले, “कुणीतरी विकृत व्यक्ती इतक्या घाणेरड्या…”
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी, “देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समितीतून सर्वात प्रथम जनसंघवाले फुटले. शिवसेनेची पंचवीस वर्षे युतीमध्ये सडली. त्यानंतर यांचा हिंदुत्वाचा बुरखा फाटला आणि यांचा भेसूर चेहरा सर्वाना दिसला,” असा टोला लगावला.
अजित पवारांबद्दल काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचा थेट उल्लेख टाळला असला तरी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत त्या प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधला. “आम्ही काँग्रेससोबत जाऊनही हातातला भगवा सोडला नाही. आम्ही जे केले ते उघडपणे केले. पण तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण : पवारांविरोधातील आक्षेपार्ह मजकूराबद्दल फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अलिकडच्या काळात…”
अजित पवारांची नाराजी
अजित पवारांना सांगलीमधील पत्रकार परिषदेमध्ये याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पहाटेच्या शपथविधीचा मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये उल्लेख केल्याचं विचारलं असता अजित पवारांनी चिडलेल्या स्वरातच पत्रकारांना उत्तर दिलं. “मी त्या वेळेस सांगितलेलं आहे मला वाटेल त्यावेळेस सांगेन, आता मला वाटत नाही सांगावंस, संपला विषय. मी तेव्हाच स्पष्ट केलं आहे. तुम्ही कितीही घोळून विचारलं तरी जोपर्यंत अजित पवारच्या मनात येत नाही तोपर्यंत तो बोलणार नाही. आता तो विषय एवढा महत्वाचा आहे का? झालं अडीच वर्ष पाणी वाहून गेलं. सरकार आलंय सगळे व्यवस्थित काम करतायत,” असं अजित पवार म्हणाले.
…अन् अजित पवारांनी हात जोडले
आम्ही नाही अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी भाषणात काढली असं पत्रकारांनी म्हटलं. त्यावर बोलताना अजित पवारांनी, “ठीक आहे अशी कोणाला तरी कधीतरी आठवण येते. आणि दुर्देव हे आहे की पहाटे, पहाटे पहाटे… तुमच्यामध्ये जर सकाळी आठला पहाटे म्हणत असतील तर तुम्ही धन्यच आहात सगळे जण,” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांसमोर हात जोडले. पुढे बोलताना, “आठ वाजता तो शपथविधी झाला. आमच्यामध्ये आठला पहाट म्हणत नाही. आमच्यामध्ये पहाट पाचला, चारला म्हणतात,” असं उत्तर दिलं.