मागील काही दिवसांत शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांकडून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर अशा नेत्यांचा समावेश आहे.
सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून वादग्रस्त विधानांचा सपाटा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित सर्व नेत्यांचा शेलक्या भाषेत समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे.
हेही वाचा- चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “वाह रे पठ्ठ्या…”
खरं तर, काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यात झटापट झाली, त्यावेळी अफझल खानाने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला, अशा आशयाचं विधान गोपीचंद पडळकरांनी केलं होतं. पडळकरांच्या या विधानाचा अजित पवारांनी समाचार घेतला आहे.
हेही वाचा- Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई
गोपीचंद पडळकरांना उद्देशून अजित पवार म्हणाले, “एक तर शहाणा आमदार… त्याला काही कळतं की नाही? शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. पण हा आमदार म्हणतो, अफझल खानाने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला. तो आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर… अरे काय रे गोपीचंदा, तुला काही कळतं की नाही रे बाबा…? आमच्या बारामतीकरांनी तुझं ‘डिपॉझिट’ जप्त करून तुला परत पाठवलं होतं. तरी भाजपानं बहुमताच्या जोरावर तुम्हाला आमदार केलं. आमदार पदाचा मान-सन्मान ठेवायचा काहीतरी प्रयत्न करा,” अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.