Ajit Pawar on Jayant Patil : पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळीच्या बैठकीदरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, यावर आता खुद्द अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. अर्थसंकल्पात कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या तरतुदीसंदर्भात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतल्याचं अजित पवार म्हणाले. आज त्यांनी पुण्यात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीकरत अजित पवार आज ८.१० वाजता बैठकीच्या ठिकाणी आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर तिथे जयंत पाटीलही पोहोचले. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची चर्चा आहे. या चर्चेवर अजित पवार म्हणाले, या नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेकजण आहेत. त्यांनी काही मिटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितलं होतं. त्याकरता ५०० कोटींची तरतूद केल्याचंही जाहीर केलं होतं. यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. दोन बैठकांमध्ये थोडावेळ होता, म्हणून ती बैठक घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.

“कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन कसं वाढेल, यासंदर्भातच आज चर्चा झाली. यातून टनेज कसं वाढेल यावर चर्चा झाली. प्रायोगिक तत्वावर केलेल्या कामामुळे टनेज वाढल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे हे सर्वदूर करायचं आहे. सोयाबीन, कापूससारख्या पिकांसाठी एआयचा वापर करणं काळाची गरज आहे, या बाबी कृषी खात्याने आणि सरकारने मनावर घेतलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

तर एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घालू

“छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती, १२ बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये मुस्लिम समाजाचेही लोक होते. दारुगोळा मुस्लिम समाजाचा होता. सरदार होते, बरेचजण होते. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांनी, डॉ.बाबासाहेब आंबडेकर, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ अण्णाभाऊ साठे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दित सर्व समाजाला पुढे ठेवून त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नको ते प्रश्न काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सर्वांचं आहे. माझ्या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं तर मी सांगेन. इतर मंत्र्यांनी केलं तर मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या कानावर घालेन”, असा इशाराही त्यांनी दिला.