मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी विधानं केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर महाराष्ट्रात विविध ठिकाणी लागले आहेत. त्यामुळे अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं विधान जयंत पाटलांनी केलं. जयंत पाटलांच्या या विधानावर स्वत: अजित पवार यांनी नऊ शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी “२०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार” या जयंत पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो.”

महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास फायदा होईल का? असं विचारलं असता अजित पवार पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्यास निश्चित फायदा होईल, हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाही, तीन पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर ज्या उद्देशाने भाजपाने एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन सरकार अस्तित्वात आणलं, याला दहा महिने पूर्ण झाले, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे जे आमदार गेले, त्यांच्या मतदारसंघातील मार्केट कमिटीच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याचं पाहायला मिळालं, असंही अजित पवार पुढे म्हणाले.

हेही वाचा- “पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार”, जयंत पाटलांच्या विधानावर राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आधी…”

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल.