Ajit Pawar On Jitendra Awhad : बदलापूर येथील दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. मात्र, या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आज मुंबईत संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा मुंबईत काढण्यात आला. या मोर्चात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांच्या तपासात असं काही सिद्ध झालं आहे का? ज्या कोणाकडे काही माहिती असेल त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी, मग चौकशी करण्यात येईल’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी आरोपी अक्षय शिंदेबाबत केलेल्या विधानासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “पोलिसांच्या तपासात असं काही सिद्ध झालं आहे का? कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मग आम्हाला विचारलं जातं. दुसऱ्यांनी काय म्हटलं त्याचं आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही कायद्याने आणि नियमाने कारवाई करतो. आता ज्या कोणाकडे काही माहिती असेल त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी. मग त्या माहितीची चौकशी केली जाईल. त्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही”, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“पोलिसांना बदनाम केलं जातंय. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्या. मग तो कोणता रिव्हॉल्वर काढणार? कोणाच्या खिशातून काढणार? आता तर हेही सिद्ध झालंय की त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत. हे प्रकरण बलात्काराचं असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या झाली. बलात्कार केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई म्हणतोय, अक्षय शिंदेची हत्या झाल्यानंतर ते लगेच हजर झाले. यातील सर्वात मोठी गोष्ट असते माणसाची मेमरी शॉर्ट आहे. या एकाच गेमवर सरकार खेळत असतं”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on jitendra awhad statement to badlapur rape case akshay shinde and police encounter gkt