Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारची अतिमहत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता वादाच्या फेऱ्यात अडकली आहे. नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

लाडकी बहीण योजनेविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराकरता जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढ्या निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. ती सुरूच राहणार आहे.”

महिलांनो, एकाच योजनेचा लाभ घ्या

दरम्यान, नमो योजना शेतकरी पात्र महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत. दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या ८ लाख पात्र महिलांना नमो योजनेतील एक हजार अन् लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चेवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, दोन्ही योजनेत पात्र असलेल्या महिलांनी कोणत्यातरी एकाच योजनेचा लाभ घ्यावा. केंद्र सरकारकडून मिळणारी रक्कम त्यांना मिळणारच आहे. पण राज्याच्या योजनेतील ५०० रुपये न घेता लाडकी बहीण योजनेतील १५०० रुपयांच्या योजनेचा लाभ घ्या”, असं आवाहन अजित पवारांनी केलंय.

मंत्री आदिती तटकरे यांनीही दिलं स्पष्टीकरण

आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटलंय की, “दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.” म्हणजेच या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या त्या आठ महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त ५०० रुपयेच मिळणार आहेत. या महिन्यातील हप्त्यापासून याची सुरुवात होणार आहे.