Ajit Pawar On Loan Waiver of Farmers : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळले. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे जाहीर केले होते. मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

भाषणादरम्यान समोर बसलेल्या एका कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?.. मी जेवढी भाषणं केली…तुला एक माहिती आहे का? आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात… राज्याचा गाडा आपल्याकडे आहे. आपण दोघं नंतर बसू… तुला मी माझी परिस्थिती सांगतो…मग तू मला तुझा सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू. आपण करायला कमी पडणार नाही”.

अजित पवार यांत्या विधानाबरोबरच महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनीदेखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं आहे. “विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत. मुलींचं उच्च शिक्षण देखील मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बील आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक योजना सुरू आहेत. तसेच आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मग कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना?”, असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलं.

हेही वाचा>> महाराष्ट्रातील मद्यप्रेमींवर महसूल वाढवण्याची जबाबदारी! रिकामी तिजोरी भरण्यासाठी सरकार कर वाढवण्याच्या तयारीत

हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण

दरम्यान आपल्या कर्जमाफीसंबंधीत विधानावर नंतर मुश्रीफ यांन स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले की, “मी असं म्हटलं की पाच वर्षांचा जाहीरनामा आहे. आर्थिक परिस्थिती पाहून राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे. सतेज पाटील यांनी थोडी कळ काढावी म्हणून मला तसं बोलावं लागलं”. तसेच ते पुढे म्हणाले की, “पाच वर्षांसाठी आपला जाहीरनामा असतो. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची परिस्थिती पाहून योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल”, असं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on loan waiver of farmers ncp hasan mushrif over devendra fadnavis announcement marathi news rak