Nagpur Winter Session 2023 Updates, 07 December 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी परिचित आहेत. अनेकदा त्यांनी केलेल्या जाहीर विधानांमुळे ते अडचणीतही आले आहेत. त्यासाठी आपण एक दिवस मौन व्रत घेऊन दिवसभर बसल्याचंही ते सभांमधून तितक्याच मिश्किलपणे सांगताना दिसतात. त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत असते. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा पोट वाढलेला एक पोटो पोस्ट करून त्यावरून कोपरखळी मारली होती. यासंदर्भात अजित पवारांनी आज नागपुरात अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मिश्किल शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. तसेच, नवाब मलिक अजित पवार गटात की शरद पवारांच्या बाजूने? यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
नवाब मलिक नेमके कुठे?
अजित पवार गटाच्या बंडापासून नवाब मलिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती. तुरुंगातून सुटल्यापासून त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आज नवा मलिक नागपुरात अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका गट कोणता? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
“ते आमदार आहेत. ते स्वत:चा निर्णय घ्यायला खंबीर आहेत. सभागृहात कुणी कुठे बसायचं हे ठरवायचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मधल्या काळात काय काय घटना घडल्या हे सगळ्यांना माहिती आहे. आज नवाब मलिक आले आहेत. मी सकाळी त्यांना फोन केला होता”, असं अजित पवार म्हणाले. मात्र, यावेळी नेमकी काय चर्चा झाली, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही.
पक्ष कार्यालयाचा मुद्दा छोटा!
दरम्यान, नागपूर विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष कार्यालय अजित पवार गटानं घेतल्याचा मुद्दा चर्चेचा ठरत असताना तो छोटा असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. “आपल्याकडे इतके महत्त्वाचे प्रश्न आहे. पण तरी इतक्या छोट्या प्रश्नांना महत्त्व दिलं जातं. तेच माध्यमांमध्ये दाखवलं जातं”, असं अजित पवार म्हणाले.
“कुणाचं पोट दाखवून प्रश्न सुटणार आहेत का?”
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा पोट वाढलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यावरून टोला लगावला होता. हे फोटो चर्चेचा विषय ठरत असताना अजित पवारांनी त्यावरून मिश्किल टिप्पणी केली. “काल तर काही वाहिन्यांनी एकदा माझं पोट दाखवलं, एकदा जितेंद्रचं पोट दाखवलं. कुणाची पोटं दाखवून महाराष्ट्रातले प्रश्न, आत्ताच्या समस्या सुटणार आहेत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “अवकाळीचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न असे इतर अनेक प्रश्न आहेत. त्याबद्दल चर्चा होणं, त्यावर कसा मार्ग काढता येईल याला महत्त्व दिलं पाहिजे”, असंही ते म्हणाले.
“दादा, तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक…”, अजित पवारांच्या वाढलेल्या पोटावर आव्हाडांची मिश्कील टिप्पणी
“अधिवेशनात सर्व प्रश्नांची चर्चा करू”
दरम्यान, विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर अधिवेशनात चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. “ज्या महत्त्वाच्या विषयांची मागणी विरोधक करतील, त्याची चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमतानं मंजूर झालेला आहे. तो ठराव होऊनही आरक्षण न्यायालयात टिकलं नाही. आता ते तसं टिकेल, अशा पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असं ते म्हणाले.