एखादं उदाहरण देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, हेच चुकीचे आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेची तुलनाच होऊ शकत नाही. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलून कसं चालेल? छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावरून टीकास्र सोडलं. लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”

संबंधित विधानावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याठिकाणी ठेवलं होतं, त्याची आणि एकनाथ शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंना कुणी बंदी केलं होतं? असा सवालही अजित पवारांनी विचारला. एकनाथ शिंदे हे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती, असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- “घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या बैठकीबाबत अधिक माहिती देताना अजित पवार म्हणाले, “आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली. तसेच नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याची माहिती शरद पवारांना दिली.”

Story img Loader