छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिली जाहीर सभा पार पडल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळाले होते. मविआच्या नेतेमंडळींच्या भाषणांपासून काहींच्या अनुपस्थितीपर्यंत सर्वच मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची दुसरी जाहीर सभा होणार आहे. थेट उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच मविआची सभा होत असल्यामुळे आज उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यांना हात घालणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, असं असलं तरी अजित पवार मात्र आजच्या सभेत भाषण करणार नाहीयेत. यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं असून त्यासंदर्भात अजित पवारांनीही भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच, अजित पवार राज्य सरकारबरोबर जाणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे. सत्ताधारी गोटातून यावर प्रतिक्रिया दिल्या जात असताना स्वत: अजित पवारांनी त्यावर अद्याप सविस्तर भूमिका मांडलेली नाही. त्यातच नाराजीमुळे अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. त्यावर अजित पवारांनीच सकाळीच नागपूरमध्ये दाखल होत या चर्चा खोट्या ठरवल्या. मात्र, सभेत आपण भाषण करणार नसल्याचं त्यांनी माध्यांना सांगितलं.

अधिवेशन चालू असतानाच सभांचं नियोजन

अधिवेशन चालू असतानाच राज्यभर मविआच्या सभा घेण्याचं नियोजन झाल्याचं अजित पवार म्हणाले. “अधिवेशन काळात एकत्र भेटून आम्ही या सभांच्या तारखा अंतिम केल्या. मविआच्या वतीने जी काही भूमिका मांडायची, ती आपण एकत्रपणे मांडू असं ठरलं”, असं अजित पवार म्हणाले.

“शरद पवार म्हणाले, कुटुंबाला टार्गेट करतायत”, संजय राऊतांच्या दाव्यावर भाजपाची खोचक टीका; म्हणे, “राऊतांना दुसऱ्याच्या घरात..!”

एकूण ७ सभा होणार

“६ ते ७ सभा पूर्ण महाराष्ट्रात घ्यायच्या असं ठरलं. आम्ही सुरुवात छत्रपती संभाजीनगरपासून केली. त्यानंतर दुसरी सभा नागपूरला आहे. तिसरी सभा १ मे रोजी मुंबईत आहे. चौथी सभा १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवसी पुण्याला आहे. शेवटची सभा ११ जूनला अमरावतीला आहे. त्याआधी नाशिक आणि कोल्हापूरला प्रत्येकी एक सभा होईल. अशा सगळ्या सभा ठरल्या आहे”, असं अजित पवार म्हणाले.

सभेत भाषण का करणार नाही?

“आमचं आधीच ठरलं होतं की सभांमध्ये प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषणं करायची. ती कुणी दोघांनी करायची ते त्या त्या पक्षानं ठरवायचं. छत्रपती संभाजी नगरला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांनी भाषण केलं. मी आणि धनंजय मुंडेंनी भाषण केलं. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरैंनी भाषण केलं. अंबादास दानवेंनी भाषण केलं नाही. दोघंच बोलायचं म्हटल्यावर दानवे जरी छत्रपती संभाजीनगरचे असले, तरी त्यांनी दोघांची नावं दिली होती”, असं अजित पवार म्हणाले.

“सगळ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललंय, तेच कळेना”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; ‘त्या’ राजकीय विधानांवर टोला!

“आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं की आपलं ठरलंय तर ठरल्याप्रमाणे आपण वागू. इथे नागपूरला आमच्याकडून जयंत पाटील आणि अनिल देशमुख भाषण करतील. कारण विदर्भातली सभा आहे. अनिल देशमुख विदर्भातले आहेत आणि जयंत पाटील आमचे प्रांताध्यक्ष आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे भाषण करतील. दुसरे कोण करणार हे मला माहिती नाही”, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

“सभा आटोपशीर व्हावी हा हेतू”

“काँग्रेसकडून बहुतेक नाना पटोले आणि सुनील केदार भाषण करतील. नाना पटोले प्रांताध्यक्ष आहेत. गेल्या वेळी त्यांनी भाषण केलं नव्हतं. सुनील केदारांनी इथली जबाबदारी घेतली होती, त्यामुळे ते भाषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सभा आटोपशीर व्हावी, सभा लांबू नये आणि येणाऱ्या श्रोत्यांना, नागरिकांना भाषणं मर्यादित वेळेत ऐकायला मिळावी, हा त्यामागचा दृष्टीकोन आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on mva nagpur vajramuth rally uddhav thackeray jayant patil pmw
Show comments